- डॉ. स्वाती हे. अणवेकर,
म्हापसा
ह्या वयात जर आपण त्यांना अगदी लहान मुलांप्रमाणे वागवले तरी त्यांना चीड येते आणि त्यांना अगदी मोठ्या मुलांप्रमाणे वागणूक दिली तर ते दुखावले जातात. शरीरातील अंतस्रावी ग्रंथी ह्या वयात प्रचंड प्रमाणात कार्यरत असतात व त्यामधून स्रवणारे स्राव ज्यांना हॉर्मोन्स असे म्हणतात ते मुलामुलींमधील होणार्या शारीरिक व मानसिक बदलांना कारणीभूत ठरतात.
मुले जन्माला आली की काय ती नकळत भरभर वाढतात व कधी मोठी होतात ते समजतसुद्धा नाही हो! ‘आम्ही नाही का चार-चार मुलांना जन्म दिला आणि लहानाचे मोठे केले’, असे हे बोलणे आजकालच्या आजी किंवा आई असलेल्या मागील २५-३० किंवा त्याहून अधिक काळाच्या मातृत्वाची जबाबदारी पार पाडलेल्या स्त्रियांचे असतात आणि ते त्यावेळी योग्य देखील होते, नाही का? कारण तो काळच तसा होता कमी प्रलोभनांचा. खरोखरच पूर्वीच्या मुलांचे बालपण आणि आजच्या मुलांचे बालपण ह्यात जमीन-आसमानचा फरक आढळतो. आणि हाच फरक मुले प्युबर्टी अर्थात पौगंडावस्था ह्या वयाच्या त्यांच्या टप्प्यातदेखील आढळून येते.
पौगंडावस्था ही मुलांच्या वयाची अशी अवस्था असते ज्यात मुले-मुली हे शरीर व मानसिक पातळीवर बर्याच बदलांना सामोरे जात असतात. ही अवस्था मुलींमध्ये साधारणपणे वयाच्या ९-१२ वर्षे ह्या काळात येते तर ती मुलांमध्ये वयाच्या ११-१४ वर्षे ह्या काळात येते. ह्या वयाच्या टप्प्यावर आपले मुल हे धड बालकही नसते न ते प्रौढ असते. त्यामुळे हा त्यांच्या वाढीचा टप्पा तसा नाजूक असतो. थोडक्यात काय तर ह्या वयात जर आपण त्यांना अगदी लहान मुलांप्रमाणे वागवले तरी त्यांना चीड येते आणि त्यांना अगदी मोठ्या मुलांप्रमाणे वागणूक दिली तर ते दुखावले जातात.
शरीरातील अंतस्रावी ग्रंथी ह्या वयात प्रचंड प्रमाणात कार्यरत असतात व त्यामधून स्रवणारे स्राव ज्यांना हॉर्मोन्स असे म्हणतात ते मुलामुलींमधील होणार्या शारीरिक व मानसिक बदलांना कारणीभूत ठरतात. आता मुलांमध्ये आणि मुलींमध्ये अवस्थानुरूप ह्या काळात कोणकोणते बदल शरीरात घडतात ते अर्वाचीन वैद्यक शास्त्रात अगदी सुंदर व सखोलरीत्या सांगितले आहे ते आपण आधी समजून घेऊया.
पौगंडावस्थेच्या अवस्था :
१) अवस्था १ –
ह्या अवस्थेत मुलांमध्ये शारीरिक बदल हे जास्त आढळून येत नाहीत. पण ह्या अवस्थेच्या शेवटच्या टप्प्यात मेंदू शरीर-अवयवांना पुढील अवस्थेतील शारीरिक बदलांना सामोरे जाण्यास तयार राहण्याची सूचना देणारे संकेत देत असतो. मेंदूमधील हायपोथॅलॅमस हा भाग गोनाडोट्रॉफिन रिलिझिंग हॉर्मोन सोडतो जो मेंदूमधील पियुष ग्रंथी म्हणजे पिट्युटरी ग्लँडपर्यंत पोहोचतो. मग ही पियुष ग्रंथीदेखीलल्युटिनाइझिंग हॉर्मोन (एलएच) व फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन (एफएसएच) तयार करते. ह्याची सुरुवात मुलींमध्ये ८ वर्ष वयानन्तर तर मुलांमध्ये १० वर्ष वयानंतर होते.
२) अवस्था २ –
ह्या अवस्थेमध्ये मुलांची शारीरिक वाढ होताना दिसते. शरीरात निर्माण होणारे हॉर्मोन्स शरीरामध्ये सर्वत्र अवयवांना संकेत देतात.
मुलींमध्ये पौगंडावस्था ९-१२ ह्या वयात आढळून येते. ह्याचे पहिले संकेत म्हणजे मुलींचे निप्पलखाली स्तननिर्मितीस सुरुवात होते ज्याला बड्स असे म्हणतात. बरेचदा ह्यामध्ये खाज येणे किंवा त्या जागी हात लावल्यावर वेदना होणे असे प्रकार घडतात, जे त्या वयात सामान्य असतात. त्यामुळे पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. तसेच बरेचदा मुलींमध्ये कधी कधी एकाच ब्रेस्ट बडची निर्मिती आधी होऊ शकते व नंतर दुसरा ब्रेस्ट बड निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्या काळात तिचा एक निप्पल हा दुसर्या निप्पलपेक्षा मोठा दिसू शकता,े जो तिची वाढ पुढे होत गेल्यावर दोन्ही स्तन सामान्य म्हणजेच एकाच आकाराचे दिसू लागतात. तसेच ह्या काळात निप्पलच्या बाजूचा गडद भाग ज्याला एरिओला म्हणतात तो आकाराने वाढू शकतो. ज्या मुली अंगकाठीने दणकट असतात त्यांच्यामध्ये पौगंडावस्था लवकर येते असे आढळून आले आहे.
ह्या अवस्थेची सुरुवात मुलांमध्ये वयाच्या ११ व्या वर्षी होते. ह्यात मुलांचे अंडकोष व त्याच्याभोवती असणारी त्वचा आकाराने वाढते. त्याचप्रमाणे शिश्नाखाली काही केसदेखील वाढू लागतात.
३) अवस्था ३ –
ह्या अवस्थेमध्ये शारीरिक बदल स्वाभाविकपणे घडतात.
मुलींमध्ये दृश्य असे शारीरिक बदल वयाच्या १२ वर्षानंतर व्हायला सुरु होतात. ते खालीलप्रमाणे आहेत.
– ब्रेस्ट बड्स वाढू लागतात व पसरतात.
– योनीभागी केसांची वाढ होते जे दाट व कुरळे असतात.
– काखेत केस येतात.
– ह्या वयात चेहरा व पाठ ह्यावर मुरूम येऊ शकतात.
– ह्या वयापासून तिची उंची वाढू लागते.
– कंबर व मांड्या ह्यावर चरबीचा स्तर निर्माण होऊ लागतो.
मुलांमध्ये ही अवस्था वयाच्या १३व्या वर्षापासून सुरु होते. ह्यात त्यांच्यामध्ये खालील बदल दिसतात.
– मुलांचे शिश्न लांब होते व अंडकोष आकाराने मोठे होतात.
– काही मुलांमध्ये निप्पलखाली थोडे स्तनांचे अवशेष वाढू लागतात जे नंतर वयापरत्वे कमी होऊ लागते.
– बर्याच मुलांमध्ये रात्री झोपेत स्वप्नात शुक्रस्राव होतो.
– मुलांचा आवाज बदलतो जो मोठ्या स्वराकडून बारीक स्वरात बोलताना फाटू लागतो.
– मांसपेशी वाढतात.
– हा मुलाच्या उंची वाढण्याचा महत्वाचा कालावधी असतो.
४) अवस्था ४ –
ह्या अवस्थेमध्ये पौगंडावस्था ही व्यक्त स्वरुपात येते. मुलामुलींमध्ये शरीरात तसे दृश्य बदल घडून येतात.
मुलींमध्ये ही अवस्था वयाच्या १३ व्या वर्षी येते ह्यामध्ये तिच्या शरीरात खालील बदल घडतात….
– स्तन निर्मिती पूर्णरूपाने सुरु होते.
– काही मुलींमध्ये पहिली मासिकपाळी ह्या दरम्यान येते पण काहींमध्ये ती ह्या आधी अथवा नंतर देखील येऊ शकते.
– उंची संथ गतीने वाढते.
– योनी भागातील केस अधिक दाट होतात.
मुलांमध्ये ही अवस्था वयाच्या १४ व्या वर्षी येते. ह्यात खालील बदल त्यांच्या शरीरात घडतात…
– त्यांचे अंडकोष, शिश्न हे मोठे होतात तसेच स्क्रोटम हा रंगाने थोडा गडद होतो.
– काखेत केस वाढतात.
– आवाज खोल व कायमचा होतो.
– चेहर्यावर मुरूम येऊ शकतात
५) अवस्था ५ –
ही पौगंडावस्थेची शेवटची अवस्था आहे. ह्या काळात मुलामुलींमध्ये शारीरिक वाढ पूर्णत्वास येते.
मुलींमध्ये ही अवस्था १५व्या वर्षी येते. ह्यात तिच्या शरीरात खालील बदल घडतात.
– स्तन प्रौढ स्त्रीच्या स्तनाप्रमाणे आकार घेतात जे १८ वर्षापर्यंत त्यात बदल घडू शकतात.
– मासिक स्राव नियमित होतो.
– मुलींमध्ये प्रथम मासिक पाळी आल्यावर १-२ वर्षात ती आपल्या प्रौढ उंचीपर्यंत येते.
– योनिकडील केस मांड्यांच्या आतील बाजू पर्यंत पसरतात.
– प्रजननसंस्था व प्रजनन अंग पूर्ण वाढतात.
– कंबर, मांड्या व कुल्हे पूर्ण आकार घेतात.
मुलांमध्येदेखील ही अवस्था वयाच्या १५ वर्षापर्यंत सुरु राहते. ह्यात त्यांच्या शरीरात खालील बदल घडतात.
– शिश्न, अंडकोष व स्क्रोटम हे प्रौढ पुरुषांप्रमाणे आकार घेतात.
– जननांगावर केस मांडीच्या आतील बाजूपर्यंत वाढतात.
– चेहर्यावर केस वाढतात व काही मुलांना दाढीदेखील करावी लागते.
– उंचीची वाढ संथ होते पण मांसपेशी वाढू लागतात.
– १८ व्या वर्षापर्यंत बर्याच मुलांची संपूर्ण शारीरिक वाढ पूर्णदेखील होते.
(क्रमशः)
(कृपया वरील उपचार हे फक्त वाचकांच्या माहितीसाठी असून त्याचा उपयोग वैद्यांच्या सल्ल्यानेच करावा).