पोळे येथे ३० लाखांचा तंबाखू जप्त

0
156

काणकोण – कारवार सीमेवरील पोळे चेक नाक्यावर काल ३० लाख रु. किमतीचा तंबाखू जप्त करण्यात आला. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी ही कारवाई केली. एका ट्रकमधून कारवारमार्गे तंबाखू गोव्यात आणण्यात येत होता.
तंबाखूजन्य पदार्थ भरलेला ट्रक गोव्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न आणि औषध खात्याचे अधिकारी सहकार्‍यांसह चेक नाक्यावर दबा धरून बसले. सदर ट्रक पोळे चेक नाक्यावर पोचताच छापा घालून ताब्यात घेण्यात आला. त्याची तपासणी केली असता अनेक गोण्यांमध्ये तंबाखू सापडला. त्यानंतर ट्रकसह माल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मालाची बाजारभावानुसार किंमत ३० लाख रुपये इतकी भरते. गोव्यात तंबाखूजन्य पदार्थ विकायला बंदी असताना अशा प्रकारचा माल येत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सदर अधिकार्‍यांनी दिली.