रायबंदर येथील गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस कोठडीतून सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान पलायन प्रकरणात अटक केलेल्या बडतर्फ आयआरबी पोलीस शिपाई अमित नाईक याची काल न्यायालयात कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
सराईत गुन्हेगार सिद्दिकी खान हा गेल्या शुक्रवारी पहाटेच्या वेळी पोलीस कोठडीतून पसार झाला असून सहा दिवस उलटले तरी त्याचा थांगपत्ता लागू शकलेला नाही. या प्रकरणामध्ये आरआरबी पोलीस शिपाई अमित नाईक याला अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी अमित नाईक याने रायबंदर येथील पोलीस कोठडीमध्ये फिनेल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याला बांबोळी येथील गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले होते. अमित नाईक याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
अमित पालेकर यांना नोटीस
सिद्दिकी याने जारी केलेल्या व्हिडिओबाबतच्या चौकशीसाठी आपचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांना गुरुवार 19 रोजी सकाळी 11 वाजता ओल्ड गोवा पोलीस स्टेशनवर हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. सिद्दिकी याने पालेकर यांच्या निवासस्थानी पाठविलेले व्हिडिओ काँग्रेसचे सुनील कवठणकर यांनी जारी केले होते.