पोलीस महासंचालकांनीच दबाव आणल्याचा आरोप

0
13

>> हणजूण पोलिसांनी मुख्य सचिवांना सादर केलेल्या अहवालात मोठा आरोप

आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर यांचे घर पाडण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालकांनी दबाव आणला होता, अशा आशयाचा अहवाल हणजूण पोलिसांनी मुख्य सचिवांना सादर केल्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. घर पाडण्याच्या कृत्यात पोलीस महासंचालकांच्या थेट सहभागावरून विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांची बदली करून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणात प्रतिक्रिया व्यक्त करण्यास तूर्त नकार देत मौन बाळगले आहे.

आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर यांच्या घराचा बराच भाग पाडण्यात आल्या प्रकरणी हणजूण पोलिसांनी सविस्तर अहवाल मुख्य सचिवांना सादर केला आहे.
पोलीस महासंचालकांनी 24 जून रोजी मला पणजी मुख्यालयात येण्याचा निर्देश दिला. त्यानुसार मी त्यांच्या कार्यालयात गेलो. त्यावेळी अर्शद ख्वाजा यांना घर पाडण्याचे काम पूर्ण करू दिले नाही म्हणून त्यांनी मला खडसवायला सुरुवात केली. तसेच, माझ्याविरुद्ध उच्चस्तरीय समिती कार्यवाही करेल, अशी धमकी दिली. याशिवाय गोव्यातून अन्यत्र बदली झाली, तर जेथे नियुक्ती होईल, तिथे एनडीपीएस कायद्याखाली बनावट गुन्हा दाखल करेन आणि हणजूण पोलीस निरीक्षकाच्या संगनमताने अमलीपदार्थ व्यवहार करत असल्याचा जबाब त्या आरोपीकडून नोंदवून घेऊन मला अमलीपदार्थ प्रकरणात फसवण्याची धमकी महासंचालकांनी दिली, असे निलंबित पोलीस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी अहवालात म्हटले आहे.
आसगाव प्रकरणी आपल्याकडे पोहोचलेल्या अहवालावर नाव आणि स्वाक्षरी नाही. त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आला आहे. या अहवालाची पडताळणी न करता कुठलाही निष्कर्ष काढणे चुकीचे ठरणार आहे, असे पोलीस अधीक्षक (गुन्हा विभाग) राहुल गुप्ता यांनी काल सांगितले. या प्रकरणाचा तपास आधीच सुरू आहे. या प्रकरणात मुक्त, निष्पक्ष आणि जलदगतीने तपासाला प्राधान्य दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.

3 महिला बाऊन्सरना अटक

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने आसगाव येथील आगरवाडेकर यांचे घर पाडताना घटनास्थळी उपस्थित असलेल्या तीन महिला बाऊन्सरना काल अटक केली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहीन सौदागर (38, रा. कांदोळी), बिस्मिल्ला गोरगुंडगी (44, रा. नेरूळ) आणि शालन कल्लाप्पा मोरेकर (42, रा. कांदोळी) अशी अटक केलेल्या संशयित महिलांची नावे आहेत. या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण 8 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात हणजूण पोलिसांनी 2 संशयितांना आणि गुन्हा शाखेने 6 जणांना अटक केली आहे. तसेच दोन वाहने जप्त केली आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी बेळगाव आणि मुंबई येथे पथके रवाना झाली आहेत. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली. या प्रकरणामध्ये पूजा शर्मा या महिलेच्या सहभागाची तपास केला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
गुन्हा विभागाकडून सीआरपीसी 161 अंतर्गत आगरवाडेकर कुटुंबीयांची पुन्हा एकदा जबानी नोंदवून घेतली जाणार आहे. तक्रारदाराने आपली तक्रार मागे घेण्याबाबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रत गुन्हा विभागाला मिळाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

अहवालातील आरोप निराधार : जसपाल सिंग
हणजूणचे पोलीस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी मुख्य सचिवांना सादर केलेल्या अहवालात आपल्या विरोधात केलेले आरोप निराधार आहेत, असा दावा पोलीस महासंचालक डॉ. जसपाल सिंग यांनी काल केला. पूजा शर्मा यांच्याकडे आपला किंवा आपल्या पोलीस अधिकाऱ्यांचा संपर्क आलेला नाही, असेही सिंग यांनी म्हटले आहे. अमलीपदार्थसारख्या प्रकरणात पोलीस निरीक्षकाला फसवू शकतो अशी धमकी पोलीस महासंचालक नव्हे तर कोणताही पोलीस अधिकारी दुसऱ्या पोलिसाला देऊ शकत नाही, असेही सिंग यांनी म्हटले आहे.