>> कथित लाचप्रकरणी गोवा सरकारची कृती
पोलीस खात्यातील एका लाचप्रकरणामुळे अडचणीत आलेले पोलीस उपमहानिरीक्षक विमल आनंद गुप्ता (आयपीएस) यांना राज्य सरकारने तडकाफडकी सेवेतून मुक्त केले आहेत.
सरकारच्या कार्मिक खात्याचे अतिरिक्त सचिव यतींद्र मराळकर यांनी यासंबंधीचा आदेश काल जारी केला आहे. गुप्ता यांना केंद्रीय गृह मंत्रालयाशी संपर्क साधण्याची सूचना करण्यात आली आहे. गुप्ता यांच्याकडील किनारी सुरक्षा विभागाचा अतिरिक्त ताबा पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
गोवा पोलीस खात्याची बदनामी टाळण्यासासाठी आयपीएस अधिकार्याची तडकाफडकी परत पाठवणी करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वी लाच प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांची यापूर्वी दिल्लीला परत पाठवणी करण्यात आलेली आहे. पोलीस खात्यातील खातेनिहाय चौकशी आपल्या बाजूने करण्यासाठी चौकशी अधिकारी विमल गुप्ता यांना लाच देण्यात आल्याची तक्रार आहे. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीसाठी महिला पोलीस उपनिरीक्षक देवयानी अंबेकर आणि पोलीस शिपाई केतन नाईक यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या अन्य एका आयपीएस अधिकार्यावर लाच घेतल्याचा आरोप एका नायजेरीयन नागरिकांने केला आहे.