मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गोव्यात गुन्हेगारी माफियांना प्रोत्साहन दिल्याने गोव्याचे गुन्हेगारी स्थळात रुपांतर झाले आहे. वास्कोतील एमईएस कॉलेजजवळ पोलिसांवर गोळीबार म्हणजे गोव्यातील गुन्ह्यांनी नवीन पातळी गाठल्याचे द्योतक आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
झुआरीनगर भागातील एका बंगल्यावर सशस्त्र दरोडा आणि लोटली येथील वृद्ध महिलेकडून सोने हिसकावून घेण्याच्या प्रयत्नावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आलेमाव यांनी नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी सरकारने कृती योजना आखावी, अशी मागणी केली.
गोवा राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. दरोडेखोरांनी पोलिसांवर गोळ्या झाडल्याची घटना आणि एका वृद्ध महिलेकडून सोने हिसकावून घेण्याचा दिवसाढवळ्या प्रयत्न म्हणजे गोवा पोलीस विभाग कणाहीन असल्याचे दाखवून देत आहे. गुन्हेगारांमध्ये पोलिसांची भीती राहिलेली नाही, असेही आलेमाव म्हणाले.
भाजप सरकारला इव्हेंट्स आणि मिशन टोटल कमिशनचे वेड लागले आहे. लोकांच्या समस्यांकडे बघायला त्यांच्याकडे वेळ नाही. गोव्यातील जनतेने या अत्यंत असंवेदनशील, बेजबाबदार आणि भ्रष्ट भाजपला धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे आलेमाव यांनी म्हटले आहे.