जमिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे मुख्य प्रॉक्टर वासिम अहमद यांनी दावा केला आहे की काल दिल्ली पोलिसांनी संस्थेच्या कोणत्याही परवानगीविना विद्यापीठ संकुलात जबरदस्तीने प्रवेश करून तेथील कर्मचारी व विद्यार्थ्यांना मारहाण केली. त्यामुळे त्या सर्वांना संकुल सोडून बाहेर जावे लागले.
तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार दक्षिण दिल्लीतील न्यू फ्रेंडस् कॉलनी येथील निदर्शनावेळी हिंसाचार झाल्यानंतर स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपण विद्यापीठाच्या आवारात प्रवेश केला.
पोलिसांच्या या कृतीचा विद्यापीठाचे कुलगुरु नजमा अख्तर यांनी निषेध केला. विद्यापीठाच्या ग्रंथालयात हातात पुस्तके असलेल्या विद्यार्थ्यांची पोलिसांनी सतावणूक केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. दुपारी जो हिंसाचार झाला त्यात सहभाग घेतल्याचे आरोप संस्थेचे विद्यार्थी व शिक्षकांनी फेटाळले आहेत. कुलगुरु अख्तर यांनीही त्याला दुजोरा दिला आहे.