>> मायकल लोबोंची मागणी
प्रार्थना स्थळांवर हल्ले करून त्यांची मोडतोड करणार्या आरोपींना पकडणे जर गोवा पोलिसांना शक्य होत नसेल तर हे प्रकरण तपास कामासाठी सीबीआयकडे देण्यात यावे, अशी मागणी काल उपसभापती व कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी पत्रकार परिषदेतून केली. या हल्ल्यांचा आपण निषेध करीत असल्याचे सांगतानाच हे हल्ले करून गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडवून टाकण्यासाठी गोव्याबाहेरूनच एखादी टोळी आली असावी, असे ते म्हणाले.
गोमंतकीय हे शांतताप्रिय लोक असून गोव्यातील लोकांचे हे काम नसावे, असे आपल्याला वाटत असल्याचे लोबो म्हणाले. ह्या वाढत्या हल्ल्यांमुळे गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे लोबो म्हणाले. या प्रश्नी आपण आजच पोलिस महासंचालकांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील मंदिरे, मशिदी व चर्चेस यांना कोणत्याच प्रकारची सुरक्षा नाही. त्यामुळे हल्लेखोरांचे काम सहज होत असते. धार्मिक स्थळांना भेटी देणार्या लोकांना ते तेथे किती वाजता गेले व तेथून कधी बाहेर पडले हे लिहिणे बंधनकारक करायला हवे, अशी सूचनाही त्यांनी केली. तसेच रात्रीच्या वेळी संशयास्पदरित्या फिरणार्यांनाही पोलिसांनी ताब्यात घ्यायला हवे, असे लोबो यांनी नमूद केले. काही पोलीस अधिक्षकांच्या बदल्या करून काहीही साध्य होणार नसल्याचे ते म्हणाले. या हल्लेखोरांना पकडणार्या पोलिसांसाठी बक्षिसे जाहीर करायला हवीत, ते म्हणाले.