विदेश व्यवहार मंत्रालयाने पोर्तुगीज पासपोर्ट मिळविण्यासाठी नवीन प्रक्रियेला सुरुवात केली आहे. ह्या नवीन प्रक्रियेमुळे पोर्तुगीज पासपोर्ट मिळविण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावे लागत आहेत. त्यामुळे पोर्तुगीज पासपोर्टसाठी जुनी प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, अशी मागणी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे केली असल्याचे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी काल सांगितले.
राज्यातील युवकांना नोकर्या मिळत नसल्याने पोर्तुगीज पासपोर्ट घेऊन ते विदेशात जातात. पोर्तुगीज पासपोर्ट घेण्याची सुविधा सरकारने दिलेली आहे. त्यामुळे या सुविधेचा लाभ घेणार्यांना आम्ही अडवू शकत नाही, असेही सरदेसाई यांनी सांगितले. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गोमेकॉत येणार्या रुग्णांसाठी स्थानिक व बाहेरील अशा सुरू केलेल्या दोन रांगांचे मंत्री सरदेसाई यांनी समर्थन केले. सुविधांचा लाभ घेण्यास स्थानिकांना प्राधान्यक्रम मिळाला पाहिजे. हा निर्णय गोवा फॉरवर्डच्या मूळ संकल्पनेशी जुळणारा आहे, असेही सरदेसाई म्हणाले.
दोन माजी आमदार गोवा फॉरवर्डमध्ये
गोवा फॉरवर्डच्या सदस्य नोंदणी मोहिमेला कालपासून प्रारंभ करण्यात आला असून वेळ्ळीच्या माजी आमदार फॅरेल फुर्तादो आणि सांताक्रुझचे माजी आमदार व्हीक्टर गोन्साल्विस यांनी गोवा फॉरवर्डमध्ये काल प्रवेश केला. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी दोघांचे स्वागत केले. यावेळी पक्षाचे नेते तथा मच्छीमारी मंत्री विनोद पालयेकर, गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर, माजी मंत्री बाबूश मोन्सेरात, पक्षाचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो, अकबर मुल्ला व इतरांची उपस्थिती होती. पक्षाच्या नवीन सदस्य नोंदणीच्या संख्येबाबत ठरावीक उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले नाही. पक्षाची ध्येय-धोरणे मान्य असलेल्या नागरिकांना पक्षाची दारे खुली आहेेत, असे अध्यक्ष सरदेसाई यांनी सांगितले.