राज्यातील पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारलेल्या नागरिकांच्या रेशनकार्डांची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती नागरी पुरवठा मंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
सालसेत तालुक्यातील पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारलेल्या अनेकांकडे रेशनकार्ड असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीची रेशनकार्ड रद्द केली जाणार आहेत. बार्देश तालुक्यात एका विदेश नागरिकाला रेशनकार्ड देण्याचा प्रकार यापूर्वी घडलेला आहे. हा प्रकार आपल्या कारकार्दीत घडलेला नाही. याप्रकरणी योग्य कारवाई करून रेशनकार्ड रद्द करण्यात आले आहे, असेही मंत्री गावडे यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले. रेशनकार्डला आधारकार्ड जोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यात सुमारे ३ लाख ३७ हजार रेशनकार्डधारक आहेत. सर्व रेशनकार्डधारकांना आधारकार्ड सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. रेशनकार्डला आधारकार्ड जोडणार नाहीत त्यांना रेशनकार्डची गरज नसल्याचे गृहीत धरण्यात येणार आहे. स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून सर्व रेशनकार्डधारकांपर्यंत आधारकार्ड जोडण्याचा अर्ज पाठविला जात आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले. रेशनकार्ड कुणालाही नाकारले जाऊ शकत नाही. तथापि, रेशन कार्डासाठी अर्ज करणार्या व्यक्तीने संबंधित अधिकारणीकडून जुने रेशनकार्ड जमा केल्याचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.