- – ऍड. प्रा. अशोक कृ. मोये
ज्याप्रमाणे वास्को-द-गामा पोर्तुगिजांना ४५० वर्षे गोव्यात स्थान देण्यास कारणीभूत ठरला, त्याचप्रमाणे ‘साबरमतीवरील गोळीबार’ पोर्तुगिजांना गोव्यातून हाकलून देण्यास कारणीभूत ठरला!
१४९५ च्या काळातील पुरोगामी वृत्तीचे पोर्तुगीज राजे ‘दो मान्युएल’ यांनी आपल्या देशाच्या व्यापाराची भरभराट करण्याच्या दृष्टीने आणि आपल्या देशाची हिंदुस्थानात वसाहत उभारण्यासाठीच्या स्वार्थी हेतूने आपल्या धाडसी दर्यावर्दी नाविकांना प्रोत्साहित करून ‘बारतोलोमेव डायस’ याच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानकडे जाणारा जलमार्ग शोधण्यास पाठविले. अर्थातच त्यांना जबरदस्त आर्थिक मदत देऊन, लष्करी व इतर आवश्यक वस्तूंनी सुसज्ज करून पाठवले गेले. परंतु त्यांची गलबते आफ्रिकेच्या शेवटच्या टोकापर्यंतच पोचू शकली. त्यांनी त्या टोकाचे ‘केप ऑफ गूड होप’ असे नामांकन केले. अनेक जबरदस्त अशा कित्येक अडचणींमुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत व परत मायदेशी परतले.
त्यानंतर दो मान्युएल राजाने ‘इस्तेव्हा गामा’ या दर्यावर्दीची निवड त्या मोहिमेसाठी केली. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली. परंतु सफर सुरू होण्यापूर्वीच अचानक गामाचा मृत्यू झाल्याने त्याचा मुलगा वास्को-डी-गामा याची त्याच्याजागी नेमणूक करण्यात आली व चार मोठी गलबते, त्यावरील खलाशी व इतर काही नौसैनिक मिळून १६० माणसांचा ताफा जुलै १४९७ रोजी हिंदुस्थानच्या शोधात निघाला. त्या गलबतांवर पोर्तुगीज ध्वज लावण्यात आले होते. सागरी मार्गातील अनेक खडतर अशा संकटांना सामोरे जात अखेर त्या शूर अशा दर्यावर्दींना १९ मे १४९८ रोजी हिंदुस्थानचा किनारा दृष्टीस पडला. हिंदुस्थानचा जलमार्ग पहिल्यांदाच व सर्वप्रथम शोधण्यास यशस्वी झाल्यामुळेच पोर्तुगीज गोवा, दमण आणि दीव
या ठिकाणी १५० वर्षे राज्य करू शकले व त्याचे सर्व श्रेय वास्को-द-गामा यांना देण्यात आले. कारण त्याच्या त्या सफरीला जगाच्या इतिहासात महत्त्वाचे असे स्थान प्राप्त झाले.
याच सफरीमुळे इंग्लिश, फ्रेंच, डच, स्पेनिश देशांतील दर्यावर्दी पूर्वेकडच्या देशांपर्यंत पोचले होते. वास्को-द-गामा हिंदुद्वेष्टा होता, म्हणूनच त्याचा तिरस्कार करणे योग्य होते. परंतु त्याने अफाट प्रयत्नांतून पोर्तुगाल ते हिंदुस्थान हा सागरी जलमार्ग शोधण्यात यश मिळवल्यामुळे त्याचे जगभरात व हिंदुस्थानातसुद्धा सुरुवातीच्या काळात कौतुक करण्यात आले.
वास्को-द-गामा तीन वेळा हिंदुस्थानात येऊन गेला. त्याने त्यावेळी हिंदुस्थानासंबंधी हवी असलेली सर्व माहिती पोर्तुगीज सरकारला पुरवली व त्याच आधारावर पोर्तुगिजांनी गोव्यात शिरकाव केला. त्यानंतर हळूहळू गोव्याच्या इतर भागांवर कब्जा मिळवला व दमण आणि दीवही आपल्या ताब्यात घेतले.
पोर्तुगिजांचे त्या काळातील राजकारण हिंदुद्वेष्टे असल्यामुळेच त्यांनी गोव्यातील अनेक मंदिरे नष्ट केली, अनेक हिंदूंना बाटवले, हिंदूंचा प्रचंड छळ केला. म्हणूनच त्याच्याविषयी हिंदूंच्या मनात प्रचंड तिरस्कार उत्पन्न झालेला होता. त्या काळात पोर्तुगीज राजवटीचा बिमोड करण्याकरिता १६६८ साली शिवाजी महाराजांनी गोव्यात शिरून काही गावे जिंकली होती. परंतु गोव्याच्या व्हाईसरॉयने आपला एक वकील महाराजांकडे पाठवून तह केला व पोर्तुगिजांना पिटाळून लावण्याकरिता आखलेल्या मोहिमेला शिवाजी महाराजांना मूर्त स्वरूप देता आले नाही आणि ती मोहीम असफल झाली. त्या काळात शिवाजी महाराज नार्वे गावात येऊन गेले. त्यांनी भग्न अवस्थेतील सप्तकोटीश्वराचे देऊन व्यथित होऊन पाहिले, शिवाचे दर्शन घेतले व मनाशी या क्षेत्राला पुनर्वेभव प्राप्त करून द्यायचा निश्चय केला. १३ नोव्हेंबर १६६८ साली त्यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
१६८० साली शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर गोवा मुक्तीचे कार्य संभाजी महाराजांनी हाती घेतले व त्यांनी पण गोव्याच्या काही भागांवर कब्जा मिळवला. परंतु औरंगजेब महाराष्ट्र बळकावण्यासाठी आपले प्रचंड सैन्य घेऊन उत्तरेकडून महाराष्ट्रात पोचल्यामुळे संभाजी महाराजांना पण गोव्यावरची मोहीम अर्धवट सोडून जावे लागले.
त्यानंतर पोर्तुगिजांच्या जुलमी सत्तेविरुद्ध अनेक उठाव करण्यात आले. सत्तरीच्या राणेंनी १७४० ते १८८५ या काळात पोर्तुगिजांविरुद्ध वारंवार उठाव केले. त्यामुळे १९४६ साली डॉ. राम मनोहर लोहिया यांनी केलेल्या आंदोलनात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी भाग घेतला. भारतातील हजारो सत्याग्रही टोळ्या-टोळ्याने हातात तिरंगा घेऊन गोव्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना अनेकांना पकडण्यात आले. काहींना गोळ्या घालून ठार करण्यात आले. या सत्याग्रहीत पिटर आल्वारिस, सुधाताई जोशी, जयवंत टिळक, महादेवशास्त्री जोशी, नानासाहेब गोरे, मधू दंडवते, मोहन रानडे, तेलू मास्कारेन्हास इत्यादींचा समावेश होता व त्यात अनेकजण सहभागी होत असत. गोव्याच्या अनेक भागांत कित्येक स्वातंत्र्यसैनिकांनीही सत्याग्रह केले, परंतु त्याचा परिणाम त्यांना तुरुंगात डांबण्यात झाला. त्यामुळे त्यात हवे तसे यश मिळू शकले नाही. ‘भारत सरकारने पण या सत्याग्रहाच्या अग्निकुंडात थंड पाणी ओतून ते कुंड विझवून टाकले’ असे मजेशीर विधान एका पुस्तकातून वाचनात आले. कारण त्या काळात भारत सरकार गोवा मुक्त करण्यासाठी कोणतीच हालचाल करत असल्याचे दिसून येत नव्हते. सरकारला तो प्रश्न शांततेनेच सोडवायचा होता व त्यामुळे सहजासहजी सुटू शकणारा प्रश्न कित्येक वर्षे खितपत पडला. याचे दुसरे कारण म्हणजे, चीन आणि पाकिस्तान यांनी चालविलेल्या सीमेवरील कुरापती, ज्यामुळे सरकारला गोव्याचा प्रश्न हाती घेणे कठीण वाटत होते.
१७ नोव्हेंबर १९६१ रोजी ‘सिंधीया स्टिमशीप’ची ‘साबरमती’ नावाची प्रवासी बोट मुंबईहून कोचीनकडे जात असताना अंजदीव बेटावरून पोर्तुगीज पोलिसांनी अकारण गोळीबार केला व त्यात बोटीवरील मुख्य इंजिनिअर जखमी झाले. त्यापाठोपाठ २४-२५ नोव्हेंबरच्या रात्री कारवार येथे मासे पकडणार्या बोटीवरही गोळीबार करण्यात आला व त्यात एक कोळी दगावला तेव्हा शांततावादी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना गोव्यावर लष्करी कारवाई करून गोवा मुक्त करावा लागला. त्यासाठी मेजर जनरल के. पी. कँडेथ यांना त्या मोहिमेचे प्रमुख नेमण्यात आले व सौम्यशा पोर्तुगिजांच्या प्रतिकारशक्तीला सागरी, हवाई आणि जमिनीवरून जबरदस्त तडाखा दोऊन जनरल कँडेथानी दोन दिवसांत गोवा पोर्तुगिजांकडून ताब्यात घेतला. त्या वेळचे गोव्याचे गव्हर्नर जनरल मॅन्युअल आन्तोनिओ वासालो दे सिल्वा यांनी शरणागती पत्रावर सही केली. नंतर गोवा, दमण आणि दीव भारताच्या राष्ट्रीय प्रवाहात सामील झाला. जनरल के. पी. अँडेथ यांना गोवा, दमण आणि दीवचे पहिले लष्करी गव्हर्नर म्हणून नेमण्यात आल्याने त्यांचे नाव गोव्याच्या इतिहासात कायमचेच ठळक अक्षरांनी कोरलेले आढळते.
आम्ही हर्षभरीत होऊन कित्येकजण कालापूरहून पणजीला चालत येऊन १९ डिसेंबर १९६१ चा दिवस पणजीत राहूनच प्रचंड सनसमूदायाबरोबर साजरा केलेला असल्याने त्या आठवणीला उजाळा द्यावासा वाटला. कारण त्या काळात मी पोर्तुगीज लायसेयमचा विद्यार्थी असल्याने मला या सगळ्या इतिहासाची पूर्ण जाणीव आहे.
ज्याप्रमाणे वास्को-द-गामा पोर्तुगिजांना ४५० वर्षे गोव्यात स्थान देण्यास कारणीभूत ठरला, त्याचप्रमाणे ‘साबरमतीवरील गोळीबार’ पोर्तुगिजांना गोव्यातून हाकलून देण्यास कारणीभूत ठरला!