
>> रोनाल्डोचा हेडरवर गोल; मोरोक्कोचे आव्हान संपुष्टात
स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डोने हेडरद्वारे नोंदविलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर पोर्तुगालने मोरोक्कोचा १-० असा पराभव करीत पूर्ण गुणांसह ‘ब’ गटात ३ गुणांसह अव्वस्थानी पोहोचला आहे. सलग दुसर्या पराभवामुळे मोरोक्को संघाचे आव्हान जवळ जवळ संपुष्टातच आले आहे.
अपेक्षेप्रमाणे पोर्तुगाली संघाने सामन्यात वर्चस्व राखले होते. परंतु या सामन्यात मोरोक्कन संघाने पोर्तुगालला बरेच झुंजविले. त्यांनी काही चांगल्या संधीही गमावल्या. अन्यथा निकाल वेगळा लागू शकला असता.
पोर्तुगालने आक्रमक सुरुवात केली. सामन्याच्या प्रारंभीच ४थ्या मिनिटाला त्यांनी आघाडी घेतली. मांटिन्होनेच्या डाव्या विंगेतून मिळालेल्या क्रॉसवर रोनाल्डोने हेडरद्वारे प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला कोणतीही संधी न देता संघाचा महत्त्वपूर्ण विजय साकाराला. हाच या सामन्यातील एकमेव विजय गोल ठरला.
पहिल्या लढतीत रोनाल्डोच्या जादुई खेळामुळे स्पेनला ३-३ असे बरोबरीत रोखलेल्या पोर्तुगालला पूर्ण बाद फेरीसाठीचे आपले आव्हान टिकून ठेवण्यासाठी पूर्ण गुणांची आवश्यकता होती. आणि रोनाल्डोने संघाला विजय मिळवून देत संघाला महत्त्वपूर्ण गुण प्राप्त करून दिले.
या गोलबरोबरच सर्वाधिक गोल नोंदविणार्या खेळाडूंत रोनाल्डोने ४ गोल नोंदवित आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. तर त्याने आणखी एक पराक्रमही केला. विश्वचषक स्पर्धेत डाव्या व उजव्या पायाच्या फटक्यांनी गोल नोंदविण्याबरोबरच हेडरद्वारे गोल नोंेदविणारा १९६६नंतर पोर्तुगालचा पहिला फुटबॉलपटू ठरला. यापूर्वी जोस टॉरेसच्या नावावर हा विक्रम होता.
आता पोर्तुगालचा पुढील सामना इराणशी २५ जून रोजी होणार आहे. तर त्याच दिवशी मोरोक्को संघ स्पेनविरुद्ध लढणार आहे.