अमेरे-पोरस्कडे येथे मुख्य रस्त्यावर काल कार गाडीचा स्कूटरला धक्का बसून झालेल्या अपघातात उगवे येथील दिपाली बेनित फर्नांडिस (वय ४१ वर्षे) ठार झाल्या. त्या उगवे येथील सेंट जोसेफ विद्यालयात शिक्षिका म्हणून काम करत होत्या.
याबाबत वृत्त असे की दिपाली फर्नांडिस काल पेडणे येथून चर्चची प्रार्थना संपवून आपल्या स्कूटरवरून उगवे येथे घरी जात होत्या. अमेरे-पोरस्कडे येथे पोचल्या असताना जीए-०६-ई-०६७९ या कारने त्यांच्या स्कूटरला धडक दिली. दिपाली रस्त्यावर पडल्या असता त्याचवेळी तेथून जाणार्या ट्रकच्या मागील चाकाला त्यांचे डोके आपटल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना पेडणे आरोग्य केंद्रावर नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अपघातास कारणीभूत कारचालक साल्वादोर फर्नांडिस-वास्को याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंद केला. ट्रक चालकालाही पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली.