भारतीय तटरक्षक दलाला मोठे यश मिळाले आहे. तटरक्षक दलाचे जहाज ‘अंकित’ने शनिवारी रात्री अरबी समुद्रात केलेल्या कारवाईदरम्यान ‘यासिन’ या पाकिस्तानी बोटीला अडवले. या बोटीत चालक दलासह १० पाकिस्तानी होते. पाकिस्तानी बोट भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होती. भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकार्यांनी सांगितले की, पाकिस्तानी क्रूला पोरबंदरला चौकशीसाठी नेले जात आहे.
भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकार्यांनी सांगितले की, पाकिस्तानी बोट भारतीय पाण्यात सहा ते सात मैल आत घुसली होती. भारतीय तटरक्षक दलाच्या जहाज पाहताच पाकिस्तानी बोट पळ काढू लागली होती, मात्र त्यानंतर तटरक्षक दलाने कारवाई करत बोट पकडली. बोटीतून आतापर्यंत दोन टन मासे आणि ६०० लिटर इंधन जप्त करण्यात आले आहे. पोरबंदरला पोहोचल्यानंतर पुढील चौकशी केली जाईल.