मडगाव (न. प्र.)
मांद्रे व शिरोडा मतदारसंघात होणार्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचार करण्यासाठी काल दक्षिण गोवा कॉंग्रेस जिल्हा कार्यालयात सर्व कॉंग्रेस आमदारांची तातडीची बैठक झाली. बैठकीत दोन्ही जागी कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यासंबंधी चर्चा झाल्याचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी सांगितले.
कळंगुट येथील हॉटेलमधून मडगाव कॉंग्रेस कचेरीत दाराआड बैठक घेत असल्याने सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. प्रतापसिंह राणे सोडून सर्व आमदार बैठकीला उपस्थित होते. कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कचेरीच्या बाहेर उत्साह दिसून येत होता. काही राजकीय घडामोडी होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. दरम्यान, आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी आपण हीट लिस्टवर असल्याचे सांगून काही सांगण्यास नकार दिला. कॉंग्रेसचे सचिव व गोवा प्रभारी चेल्लाकुमार यांनी पोटनिवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी बैठक घेतल्याचे सांगितले. दोन्ही जागा खात्रीने जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुभाष शिरोडकर यांनी जमिनीच्या सौद्यातून ७० कोटी मिळविले व बदल्यात कॉंग्रेस सोडल्याचा आरोप त्यांनी केला.