पोटनिवडणुकांचा अन्वयार्थ

0
23

उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, तेलंगणा, महाराष्ट्र व उडिसा या सहा राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने एकूण सात जागांपैकी चार जागा जिंकल्याने या विजयाचा वापर आगामी हिमाचल व गुजरातच्या निवडणुकांमध्ये होईल, परंतु अर्थात, ह्या पोटनिवडणुकांकडे बारकाईने पाहिले, तर लक्षात येईल की या चारपैकी तीन जागा भाजपच्याच होत्या. बहुतेक जागांवर विद्यमान भाजप आमदारांचे एक तर निधन झाल्याने किंवा तेथील कॉंग्रेस आमदार भाजपात गेल्याने ह्या पोटनिवडणुका घ्याव्या लागल्या होत्या. जेव्हा एखादा विद्यमान आमदार निधन पावतो, तेव्हा त्याच्या निकटवर्तीयाला जर पक्षाने तेथून उमेदवारी दिली तर मतदारांची सहानुभूती त्याला मिळते हे अनेकदा दिसून येते. यावेळीही तसेच घडले आहे.
भाजपला ज्या चार जागा मिळाल्या आहेत, त्या चारही ठिकाणी आधीच्या आमदारांच्या नातलगांनाच विजय मिळालेला आहे. हरियाणातील आदमपूरमध्ये भजनलालांचा नातू व कुलदीप बिश्‍नोईंचा मुलगा भव्य निवडून आला आहे. कुलदीप बिश्‍नोई कॉंग्रेस सोडून भाजपात प्रवेशकर्ते झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवरील ती निवडणूक होती. तेथे भव्य निवडून येणे यात काही आश्‍चर्य नाही, कारण १९६८ पासून आदमपूर हा बिश्‍नोईंचा बालेकिल्लाच राहिला आहे.
उत्तर प्रदेशातील गोला गोकर्णनाथच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते. पण तेथेही वडील अरविंदगिरी यांच्या जागेवर पुत्र अमन गिरी उभे होते. समाजवादी पक्षाशी भाजपची तेथे थेट टक्कर झाली. खरे तर कॉंग्रेस व बहुजन समाज पक्षाने आपले उमेदवार उभे न केल्याने समाजवादी पक्ष याहून चांगली कामगिरी करू शकला असता, परंतु ते घडले नाही. भाजपच्या गिरी यांना ५५ टक्के मते मिळाल्याने विरोधकांसाठी हा निश्‍चितच चिंतेचा विषय असेल.
बिहारमधील गोपालगंजची जागा भाजपने जिंकली, तेथेही पती सुभाषसिंग यांच्या जागेवर पत्नी कुसुमदेवी उभ्या होत्या. तेथे त्या अत्यल्प मतांनी विजयी झाल्या आहेत. लक्षात घ्या, नीतिशकुमार भाजपाशी भांडून बाहेर पडून त्यांनी बनवलेल्या जेडीयू – आरजेडी – कॉंग्रेस महागठबंधनसाठी ही पहिली कसोटी होती. त्यामुळे भाजपशी तेथे सामना निकराचा झाला. मात्र, एआयएमआयएमने आपला उमेदवार उभा केल्याने ते भाजपच्या पथ्यावर पडलेले दिसते. मात्र, लालूंच्या मतदारसंघामध्ये राजद उमेदवाराची अल्प मतांनी का होईना झालेली हार त्या पक्षासाठी मानहानीकारक ठरणारी आहे.
बिहारचीचच मोकामाची दुसरी जागा मात्र राजदच्या नीलमदेवींनी जिंकली आहे. अर्थात, तेथेही पतीच्या अपात्रतेनंतर त्यांनी ती पोटनिवडणूक लढवली होती. उडिशातील धामनगरची जागा सत्ताधारी बीजू जनता दलाकडून भाजपने मिळवली आहे.
महाराष्ट्रात मुंबईतील अंधेरी (पूर्व) चे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने उद्धव ठाकरे गटाने त्यांची पत्नी ऋजुता लटके यांना तेथून उमेदवारी दिली, तेव्हा त्यात अडथळे आणण्याचा मोठा प्रयत्न शिंदे गटाकडून व अप्रत्यक्षपणे भाजपकडूनही झाला होता. परंतु शेवटी राज ठाकरे यांनी पत्र लिहिल्याने भाजपाने तेथे उमेदवार उभा केला नाही त्यामुळे ऋजुता यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. मात्र, तरीही तेथे जवळजवळ पंधरा टक्के मते ही ‘नोटा’ला पडली आहेत. याचा अर्थ लटकेंविरुद्ध उमेदवार जरी उभा केला गेला नव्हता, तरी आपल्या मतदारांची मते ‘नोटा’ला मिळावीत अशी तजवीज भाजपने तेथे केली होती असे मानायला वाव आहे.
तेलंगणातील मुनुगोडेच्या निवडणुकीत कॉंग्रेसमधून राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केलेल्या कोमती रेड्डी राजगोपाल रेड्डींना तेलंगणा राष्ट्रसमितीने धडा शिकवला आहे. भारत राष्ट्र समिती असे नवे नाव घेऊन राष्ट्रीय स्तरावर येण्याची स्वप्ने पाहणार्‍या टीआरएससाठी हा विजय महत्त्वाचा आहे. कॉंग्रेसमधून भाजपात गेलेल्या उमेदवाराचा पाडाव करून टीआरएसने अजूनही प्रादेशिक राजकारणात आपण वरचढ असल्याचे दाखवून दिले आहे. कॉंग्रेसचा उमेदवार तेथे तिसर्‍या स्थानी फेकला जाणे मात्र नामुष्कीचे म्हणावे लागेल, कारण तेव्हा राहुल गांधींची भारत जोडो यात्रा तेलंगणातून गेली होती. वर म्हटल्याप्रमाणे ह्या पोटनिवडणुका विद्यमान आमदारांच्या नातलगांनीच लढवलेल्या असल्याने सहानुभूतीचा त्यांच्या विजयात मोठा भाग दिसतो. त्यामुळे यावरून काही कल मोजता येणार नाही, परंतु विरोधी पक्ष कॉंग्रेस अधिकाधिक दुबळा झालेला आहे आणि प्रादेशिक पक्ष मात्र अजूनही सक्षम आहेत हेही हे निकाल सांगतात.