पॉलीसिस्टीक ओवेरियन डीजीस

0
205
  • डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर
    (अध्यापक, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय)

लठ्ठपणा व मधुमेह हेदेखील पीसीओडीसाठी कारणीभुत ठरू शकते. मधुमेहामध्ये जेव्हा शरीराची इन्सुलिनची गरज वाढते, तेव्हा स्वादुपिन्ड ती गरज भागवण्यासाठी अधिक प्रमाणात इन्सुलिन स्रवविते आणि हेच अधिक इन्सुलिन अण्डाशयाला जास्त पुरुष हॉर्मोंस तयार करण्यास भाग पाडते.

‘पीसीओडी’ म्हणजेच ‘पॉलीसिस्टीक ओवेरियन डीजीस’. ह्यालाच पीसीओएस (पोलीसिस्टीक ओवेरियन/ओवरि सिंड्रोम) असेही म्हणतात. ह्या अवस्थेमध्ये महिलांच्या हॉर्मोनल पातळीमध्ये बदल होऊन ते जास्त प्रमाणात तयार केले जातात (विशेषतः टेस्टोस्टेरॉन हे पौरुष होर्मोन्स) व त्यांचे संतुलन बिघडल्यामुळे मासिक पाळी अनियमित होते. अश्याने गरोदर/गर्भवती होण्यास अडथळे येऊ शकतात.

पीसीओडीमध्ये चेहर्‍यावर व इतर त्वचेवर नवीन दाट केस येऊ लागतात व शक्यतो पुरुषांसारखे ओठांच्यावर, गालावर, हनुवटी, पोटाच्या खाली, छाती व मांड्यांवर केस येऊ लागतात. केस पातळ होऊन टक्कल पडु लागते. कपाळाच्या वरच्या बाजूचे किंवा डोक्याचा मध्य बाजुचे केस जायला लागतात. पीसीओडी वयाच्या १५-४४ वर्ष ह्या वयोगटातील महिलांमध्ये दिसून येते, असे सर्वेक्षणात आढळून आले आहे.

येथे शरिरामध्ये सर्वात जास्त जेथे फरक पडत असेल ते आहे अंडाशय/ बीजकोष (ओवरि). ओवरि हे पुनरुत्पादक अवयव आहे जे ईस्ट्रोजन व प्रोजेस्टेरोनसारखे हॉर्मोंस तयार करुन मासिक पाळी नियंत्रित करते. काही प्रमाणात ऍन्ड्रोजन नावाचे पुरुष हॉर्मोन देखील तयार करते.

तसेच एफएसएच व एलएच हे हॉर्मोंस ओव्युलेशन ही प्रक्रिया नियंत्रित ठेवतात (म्हणजेच अनुक्रमे फॉलिकल तयार करण्यासाठी ज्यात अंड असते व ते अंड पूर्णतः विकसित झाल्यावर सोडण्यासाठी अण्डाशयला उत्तेजित करते). पीसीओडीमध्ये ओव्युलेशनवर परिणाम होतो. ओवरि ह्या प्रत्येक महिन्यात अंड सोडतात जे पुरुषामधील विर्यातील शुक्राणूसोबत मिळून गर्भाधान करविते.
पीसीओडीमध्ये अंडाशयात पाण्याने भरलेल्या लहान अश्या अनेक गाठी उत्पन्न होतात. ह्यालाच पॉलीसिस्टीक(पॉली म्हणजे अनेक व सिस्ट म्हणजे गाठ/गळू).
आता हे सिस्टना खरच सिस्ट म्हणावे का? असे भरपूर मतभेद आहेत कारण हे सिस्ट एक प्रकारचे अव्यवस्थित तयार झालेले फॉलीकल असते ज्यामध्ये अंड असते.

लट्ठपणा व मधुमेह हे देखील पीसीओडीसाठी कारणीभुत ठरु शकते. मधुमेहामध्ये जेव्हा शरीराची इन्सुलिनची गरज वाढते, तेव्हा स्वादुपिन्ड हे ती गरज भागविण्यासाठी अधिक प्रमाणात इन्सुलिन स्रवविते आणि हेच अधिक मात्रेमधिल इन्सुलिन अण्डाशयाला जास्त पुरुष हॉर्मोंस तयार करण्यास भाग पाडते.

पिसीओडीमध्ये तोंडाला पुरळ/यौवनपिटिका येणे(जे त्वचेमधिल तैलाचा स्राव करणार्‍या ग्रंथीना आलेल्या सूजेमुळे होते), वजन वाढणे, नेहमी चिंतित राहणे व एकप्रकारची सतत औदासिन्यता असणे, मासिक पाळी अनियमित असणे, मासिक पाळीच्या वेळेस खूप त्रास होणे, कमी मात्रेमध्ये होणे, जास्त होणे किंवा अगदीच न होणे, रक्तस्राव हा किंचित काळपट रंगाचा असणे, पाळीच्या वेळेस पोटात/ओटीपोटात दुखणे, चक्कर येणे, अस्वस्थता जाणवणे, स्वभाव सतत बदलत राहणे, चिड़चिड़ होणे, त्वचा निस्तेज किंवा रंग थोडा काळपट होणे, झोप व्यवस्थित न लागणे, सतत डोक्यात काहीतरी विचार चालू असणे यांसारख्या तक्रारी असू शकतात.

रक्ताची तपासणी, अल्ट्रासाऊंडसारख्या तंत्रानी पीसीओडीचे निदान होऊ शकते. चयापचयाशी सम्बंधित असल्याकारणाने आहारविहार पण योग्य असणे अधिक महत्वाचे. तेलकट, तळलेले, नासलेले/कुजलेले, फ्रिजमध्ये अधिक काळ ठेवलेले अन्न किंवा पुन: पुन: वापर करुन फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ, नूडल्स, पिझ्झा, पनीर, चीज, बटर, चॉकलेट(कॅड्बरी), मायोनिज, कारबोरेटेड कोल्ड ड्रिंक्स, थंड पाणी, बाटलीमध्ये पॅक केलेले ज्यूस/स्वरस, जाम, पाव/ब्रेड, आंबवलेले पदार्थ, केळी, शिकरण, पापड़, लोणचे यांसारखे अन्न शक्यतो टाळावे. अल्प व्यायाम, थोडी शारीरिक कसरत किंवा थोडावेळ चालणे महत्वाचे. दिवास्वाप/दिवसा फार वेळ झोपणे, रात्रीचे जागरण करणे, अगदीच घरी दिवसरात्र सतत बसून काहीही शारीरिक हालचाल न करणे यांसारख्या सवयींनी त्रास अधिकच वाढतील. सुर्यनमस्कार, योगासन, प्राणायाम यांनीही चांगला उपयोग होताना दिसतो. अर्थातच मासिक पाळी इतर लक्षात घेऊन वैद्यांच्या सल्ल्याने व मार्गदर्शनातच करावे.