बनावट नोटा प्रकरणी एका उपनिरीक्षकाचे झालेले निलंबन हा गोवा पोलिसांवरचा आणखी एक कलंक आहे. वास्कोत ज्याच्यापाशी दोन लाख ७७ हजारांच्या बनावट नोटा सापडल्या, त्या आदित्य यादव ऊर्फ चिंतामणी या संशयिताचे म्हणणे खरे असेल तर त्याला या नोटा देणार्या वैभव नाईक नामक उपनिरीक्षकाकडे तीन लाख रुपयांच्या खोटा नोटा आल्या कुठून असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील खोट्या नोटा एखाद्यापाशी अपघाताने येऊच शकत नाहीत. खोट्या नोटांच्या वितरणात गुंतलेल्या आंतरराष्ट्रीय टोळीशी या पोलीस उपनिरीक्षकाचा संबंध आला असेल का, त्याच्याकडे हे पैसे कुठून आले, याची चौकशी आता कसोशीने झाली पाहिजे. देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर खोट्या नोटांचे फार मोठे आव्हान आज उभे आहे. देशात काळ्या पैशांची समांतर अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे. पाकिस्तानच्या आयएसआयचेच हे कारस्थान असल्याचा ठपका भारत सरकारने वेळोवेळी ठेवला आहे. संसदेतही सरकारने तसे निवेदन केलेले आहे.
आयएसआयचे हस्तक पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानमध्ये जर्मन बनावटीच्या अत्याधुनिक यंत्रांवर खोटा नोटा छापतात आणि नेपाळमार्गे किंवा आखाती देशांच्या मार्गे त्या भारतात आणतात, अशी गुप्तचर यंत्रणांची माहिती आहे. गोव्यातही सातत्याने गेल्या काही वर्षांत खोट्या नोटा सापडल्या आहेत. एका अग्रेसर खासगी बँकेच्या शाखांतूनच वारंवार त्या वितरित झाल्याचे निष्पन्न झाले आहे, तरीही त्यासंदर्भात ठोस कारवाई झालेली नाही. रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना खोट्या नोटांबाबत सतर्कता बाळगण्याचे आदेश दिल्याने आयएसआयच्या हस्तकांना बँकांमधून बनावट नोटा चलनात आणणे अलीकडे कठीण बनले असावे. त्यामुळेच कॅसिनोसारख्या गैरव्यवसायांतून मोठ्या प्रमाणात हा काळा पैसा पांढरा करण्याचे कारस्थान त्यांनी आखलेले दिसते. ज्या राज्यांचे नागरिक मोठ्या प्रमाणावर विदेशांत नोकरीला आहेत, अशा प्रांतांमध्ये आखाती देशांमधून या खोट्या नोटा मोठ्या प्रमाणावर पाठविल्या जातात, असे आजवर आढळून आलेले आहे. विदेशांतून परतणार्यांना १ः२ या प्रमाणात आमिष दाखवून या नोटा भारतात पाठवल्या जातात. दुबईत आफ्ताब नामक एक गुन्हेगार विदेशस्थ भारतीयांच्या मार्फत येथे खोट्या नोटा पाठवण्याचे काम कसा करतो त्याची माहिती गुप्तचर यंत्रणांपाशी आहे. सुटकेसमधून अत्तरे, सौंदर्यप्रसाधने असल्याचा बहाणा करून, अथवा फोटो अल्बम असल्याचा बनाव करून खोट्या नोटा आणणारे दक्षिणेकडील राज्यांत पकडले गेले आहेत. नेपाळमधून पश्चिम बंगालधील मजुरांच्या मदतीनेेेेेेे, त्यांना आमीष दाखवून या नोटा चलनात आणण्याचे प्रकारही पुराव्यांनिशी उघड झालेले आहेत. पश्चिम बंगालमधील मालडामधील मजूर गोव्यात या खोट्या नोटा चलनात आणताना पकडले गेले आहेत. दोन वर्षांपूर्वी वास्कोतच खोट्या नोटा वाटणार्या एका आरोपीस सात वर्षे कारावासाची सजा झाली आहे. वास्कोसारख्या शहरामध्ये परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणावर राहात आहेत. त्याचा फायदा या संघटित टोळ्या घेत असाव्यात. खोट्या नोटा फार काळ स्वतःजवळ ठेवणे धोक्याचे असल्याने त्या लवकरात लवकर चलनात कशा आणता येतील याचे डावपेच या टोळ्या आखत असतात. गोव्यातील कॅसिनोंकडे त्यांचे लक्ष गेले नसते तरच नवल! जेथे दिवसागणिक लक्षावधींची उलाढाल होते, अशा कॅसिनोंमधून या नोटा सहजगत्या चलनात आणता येतील असे या महाभागांना वाटले आणि त्यातूनच संबंधित कॅसिनोच्या अधिकार्याच्या सतर्कतेमुळे प्रत्यक्षात हा उपद्व्याप करू पाहणारे अलगद जाळ्यात अडकले. ज्यांनी या नोटा कॅसिनोत नेल्या, ते केवळ छोटे मासे आहेत. खरे म्होरके पडद्याआड आहेत. वैभव नाईक या पोलीस अधिकार्याचे नाव पुढे आलेले असले, तरी तेही हिमनगाचे टोक असू शकते. ज्याने अशा प्रकरणांचा छडा लावायचा, तो एखादा पोलीस अधिकारीच या अशा संघटित टोळीत सामील असेल तर ती खूप गंभीर बाब म्हणावी लागेल. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाणे जरुरीचे आहे. शेवटी येथे देशहित गुंतलेले आहे. खोट्या नोटा चलनात आणणे हा केवळ आर्थिक गुन्हा नाही, तो देशद्रोह आहे.