पैशांसाठीच फोंड्यातील वृद्ध बहिणींची हत्या

0
38

>> उसने घेतलेले पैसे मागितल्याने खून

>> चोवीस तासांत संशयित जेरबंद

फोंड्यातील दुहेरी खून प्रकरण हे पैशांच्या देवाण-घेवाणीतूनच घडले असून, उसने दिलेले पेसे परत परत मागितल्यानेच संशयिताने दोन्ही बहिणींची हत्या केली. संशयितानेही तशी कबुली दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा चोवीस तासांत लावत मूळ कर्नाटकमधील पण गेली अनेक वर्षे बाये – सुर्ल येथे राहत असलेल्या महादेव दुर्गा घाडी (३४) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. महादेव याने खुनाची कबुली दिली.

संशयित महादेव याने कामत रेसिडेन्सीच्या फ्लॅटमध्ये राहणार्‍या मंगला कामत व जीवन कामत या बहिणींचा शनिवारी खून केला होता. पोलिसांनी याप्रकरणी केलेल्या तपासात संशयित महादेव घाडी हा या फ्लॅटमध्ये यायचा, असे निष्पन्न झाले. महादेव याने जीवन कामत यांच्याकडून अडीच लाख रुपये घेतले होते.

संशयिताकडून चॉपरने खून
शनिवारीही उसने घेतलेल्या पैशांची मागणी केली होती. या विषयावरून वाद सुरू झाला होता. त्यानंतर बोलता बोलता जीवन ह्या किचनमध्ये गेल्यानंतर महादेवने किचनमध्ये असलेल्या चॉपरने जीवन यांच्यावर हल्ला केला. जीवन यांच्या आरडाओरड्यामुळे हॉलमध्ये असलेल्या मंगला कामत ह्या किचनमध्ये आल्या. त्यांचाही चॉपरने महादेवने खून केला. संशयित महादेव घाडी हा वेर्णा येथील एका खासगी कंपनीत ऑपरेटर म्हणून कामाला होता. तो कामत रेसिडेन्सीमध्येच इतर काही कामगारांसोबत भाड्याने राहायचा.

गेली दहा वर्षे त्याचे वास्तव्य या ठिकाणी असून त्यातूनच कामत कुटुंबीयांशी त्याची ओळख झाली होती. ओळखीतूनच त्याने जीवन यांच्याकडून पैसे कर्जाऊ घेतले होते. खुनानंतर महादेवने आपल्या भाड्याच्या खोलीत जाऊन कपडे बदलले आणि तडक बाये – सुर्ला गाठले. तपासानंतर महादेव घाडी याचाच दाट संशय पोलिसांना आल्यानंतर त्याला रात्री बाये – सुर्ल येथे जाऊन ताब्यात घेतले. हत्येसाठी वापरण्यात आलेला किचनमधील चॉपर तेथेच टाकून त्याने पळ काढल्याचेही सांगितले.
मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठवण्यात आले असून अजून अहवाल यायचा बाकी आहे.