पैकुळ पूल जनतेसाठी खुला

0
8

>> 2021 च्या महापुरात गेला होता वाहून

2021 साली पावसाळ्यात महापुरामुळे पैकुळचा पूल वाहून गेला होता. पुलाअभावी या भागातील पैकुळ आणि मेळावलीतील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. पैकुळ आणि मेळावली या गावांना जोडणाऱ्या या पुलाचे काम 19 कोटी रुपये खर्चून 9 महिन्यांत पूर्ण करण्यात आले. या पुलाचे उद्घाटन काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सत्तरी तालुक्यातील सावर्डे येथील पुलासाठीची कोनशिला पुढील दोन महिन्यांच्या आत बसवण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी व्यासपीठावर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे, नगराध्यक्षा शेहजीन शेख, अनेक पंचायतींचे सरपंच, पंच उपस्थित होते.
पैकुळ पूल गरजेचा होता. 2021च्या महापुरात हा पूल वाहून गेला होता. त्यामुळे लोकांचे हाल होत होते; पण गोवा सरकारने बांधकाम हाती घेतल्यानंतर गेल्या 9 महिन्यांत हा पूल पूर्ण करुन एक नवा आदर्श ठेवला आहे, असे राणे म्हणाले.

राणे व आपल्यात मतभेद नाहीत : मुख्यमंत्री
विश्वजीत राणे व आपल्यात कोणतेही मतभेद नसल्याचा खुलासा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. विरोधकच तशा प्रकारच्या अफवा पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला.