सर्वजण शिगमोत्सवाची मजा लुटण्यात मग्न असताना आई आणि विवाहित मुलीचा घरालगतच्या एका तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची ह्दयद्रावक घटना काल सायंकाळी ७.३० च्या दरम्यान तामणे-पैंगीण येथे घडली. विवाहित मुलीचा मृतदेह शोधण्यात अगिनशामक दलाला यश आले असून, रात्री उशिरापर्यंत आईचा मृतदेह आढळला नव्हता. तळ्यात बुडून मरण पावलेल्या आईचे नाव माया पागी, तर विवाहित मुलीचे नाव अंकिता असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मडगाव-कारवार मार्गावरील तामणे येथे रस्त्याच्या बाजूला पागी कुटुंबीयांचे मूळ घर असून, या घरापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर असलेल्या तळ्यात या दोघींचा बुडून दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या घरात शौचालयाची सोय नसल्यामुळे कदाचित नैसर्गिक विधीसाठी मायलेक तळ्याजवळ गेली असावीत आणि प्रथम आई पाय घसरून तळ्यात पडली असावी आणि तिला वाचविण्यासाठी पाण्यात गेलेली लेकही पाण्यात बुडाली असावी, असा अंदाज वाड्यावरील ग्रामस्थांनी व्यक्त केला.
विवाहित अंकिता ही नावेली-मडगाव येथे राहत होती. तिचा नवरा लंडनमध्ये नोकरी करतो. अंकिता हिचे वडील आनंद पागी हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाचे निवृत्त कर्मचारी असून, पंधरा दिवसांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे ते आजारी आहेत. आपल्या वडिलांची सेवा सुश्र्रुषा करण्यासाठी अंकिता ही आपल्या माहेरी आली होती.
तामणे येथे मायलेकीचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळताच काणकोण पोलीस व अग्निशामक दलाचे पथक त्वरित घटनास्थळी धावले. जवानांना मुलीचा मृतदेह शोधण्यात यश आले; मात्र रात्री ९.३० वाजेपर्यंत माया पागी यांचा मृतदेह सापडला नव्हता.
सदर तळी विशेष खोल नसली, तरी चिखलाने भरलेली आहे. त्यामुळे मृतदेह कदाचित चिखलात रुतला असण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर स्थानिक पंच शैलेश पागी आणि अन्य नागरिक घटनास्थळी धावून आले व त्यांनी मदतकार्य राबवले.
आजारी वडिलांवर शोककळा
घरातील कर्ता पुरुष आजारी आणि एकाच वेळी घरातील मायलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समजताच तामणेकारांचा पारंपरिक शिगमा काही काळापुरता बंद ठेवून खेळगड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या आकस्मिक घटनेने आजारी असलेले आनंद पागी पुरते कोसळले असून, त्यांचा आधारच तुटला आहे. त्यांना एक मुलगा आहे.