‘पे पार्किंग शुल्का’च्या विषयावर चर्चेसाठी सोमवारी मनपाची बैठक

0
49

>> कंत्राटाची मुदत संपल्यानंतरही पणजीत शुल्काची वसुली

येथील पणजी महानगरपालिकेच्या पे पार्किंग शुल्क वसुलीच्या कंत्राटाची मुदत संपलेली असली, तरी वाहनचालकांकडून पार्किंग शुल्क वसूल केले जात आहे. महानगरपालिकेची मान्यता नसताना कंत्राटदाराकडून पे पार्किंग शुल्काची वसुली कशी काय केली जात आहे? असा प्रश्न वाहनचालकांकडून व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने पे पार्किंग शुल्काच्या विषयावर चर्चा करण्यासाठी सोमवार दि. 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता मनपा मंडळाची खास बैठक बोलावली आहे.

पणजीतील पे-पार्किंग कराराची मुदत संपल्यानंतर महिनाभर उलटूनही ठेकेदाराकडून शहराच्या विविध भागात दुचाकी, चारचाकी वाहनांकडून पे पार्किंग शुल्क वसूल केले जात आहे. येथील मनपा प्रशासनाने सुध्दा याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कराराची मुदत संपल्यानंतर वसूल केले जाणारे पे पार्किंग शुल्क कुणाला दिले जात आहे? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

मनपाने पे-पार्किंग शुल्क वसुलीसाठी एका कंत्राटदारासोबत करार केला होता. सदर पे पार्किंग कराराची मुदत फेब्रुवारी 2023 मध्ये पूर्ण झाली. त्यानंतर मनपाने पे पार्किंग शुल्क वसुलीसाठी सहा महिन्यांची मुदत वाढ दिली होती. या मुदतवाढीबाबत विरोधी नगरसेवकांनी नापसंती दर्शवली होती. मनपाने पे पार्किंग शुल्क वसुलीला दिलेली सहा महिन्यांची मुदत ऑगस्ट महिन्यात पूर्ण झाली. त्यानंतर मनपाने कंत्राटाबाबत करार वाढवला नाही किंवा नवीन करार देखील केलेला नाही. मात्र कंत्राटदाराने पे पार्किंग शुल्क वसूल करणे सुरूच ठेवले आहे.

ऑनलाईन निविदा काढली; पण..
पे पार्किंग शुल्क वसुलीसाठी ऑनलाइन पद्धतीने निविदा काढण्यात आल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त क्लेन मदेरा यांनी दिली होती; मात्र पे पार्किंग शुल्क वसुलीबाबत महानगरपालिकेने महिना उलटला तरी निर्णय घेतला गेलेला नाही. त्यामुळे करार नसताना वसूल करण्यात आलेले महिनाभराचे पे पार्किंग शुल्क कुणाच्या खिशात जाणार? असा प्रश्न विरोधी नगरसेवक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.