पे पार्किंग कंत्राटाला मनपाकडून अखेर मान्यता

0
32

पणजी महानगरपालिका मंडळाच्या खास बैठकीत पे पार्किंग कंत्राटाच्या प्रक्रियेला अखेर काल मान्यता देण्यात आली. विरोधी गटातील तीन नगरसेवकांनी या पे पार्किंगच्या प्रक्रियेला विरोध केला, तर सत्ताधारी गटाने बहुमताच्या जोरावर कंत्राटाच्या प्रक्रिया मान्यता देण्याचा ठराव संमत केला. विरोधी गटातील नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो, उदय मडकईकर आणि ज्योएल आंद्राद यांनी अनेक मुद्दे उपस्थित करून कंत्राटात गैरव्यवहाराचा आरोप केला. तथापि, महापौर रोहित मोन्सेरात यांनी विरोधी नगरसेवकांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले.
महानगरपालिकेचे आयुक्त क्लेन मदेरा यांनी पे पार्किंग कंत्राट प्रक्रियेचे जोरदार समर्थन केले. कंत्राटदाराची मुदत 14 फेब्रुवारी 2023 रोजी संपली होती. त्याआधी 27 जानेवारी रोजी महापालिकेच्या बैठकीत त्याला सहा महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली. यानंतर 7 जुलै 2023 रोजी पे पार्किंगसाठी नव्याने निविदा काढण्यात आली. त्यात सोहम जुवारकर याने सर्वाधिक बोली लावली. तसेच, 30 ऑगस्ट रोजी सुरक्षा रक्कम म्हणून सुमारे 60 टक्के रक्कम महानगरपालिकेकडे जमा केली. तसेच, 10 टक्के अनामत रक्कम जमा केली. नवीन तीन वर्षांच्या कंत्राटाची मुदत 15 ऑगस्ट 2023 पासून सुरू झाली आहे, असे महानगरपालिका आयुक्त मदेरा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पे पार्किंग कंत्राटाची प्रक्रिया रद्द केली असती, तर नवीन प्रक्रियेसाठी आणखीन तीन ते चार महिन्यांचा कालावधी गेला असता. यामुळे महापालिकेला कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असते. सुरेंद्र फुर्तादो महापौर असताना जे कंत्राट होते, तेच आता लागू करण्यात आले आहे. यामध्ये स्थानिकांना पास आणि सरकारी वाहने या केवळ दोन नवीन बाबींचा समावेश करण्यात आला आहे, असे मदेरा यांनी सांगितले.

पणजी महानगरपालिकेच्या पे पार्किंग कंत्राटाची मुदत गेल्या 14 ऑगस्ट 2023 रोजी पूर्ण झाली होती; तथापि महानगरपालिका मंडळाची मान्यता नसताना कंत्राटदाराने पे पार्किंग शुल्क वसूल करणे सुरू ठेवले होते. त्यामुळे पै पार्किंगच्या माध्यमातून वसूल केलेले शुल्क पालिकेला न मिळता कंत्राटदाराच्या खिशात गेले. निविदा काढणे, तसेच मुदतवाढ देणे हे मुद्दे महापालिकेच्या बैठकीत आलेच नव्हते. त्या कंत्राटदाराला फायदा करून देण्याचा हेतू यामागे असण्याची शक्यता आहे, असा आरोप नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी केला.
महापौर रोहित मोन्सेरात यांनी सुरेंद्र फुर्तादो यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. दरम्यान, पणजी मार्केटमधील सोपो कर वसुलीसाठी निविदा जारी केली जाणार आहे, असेही रोहित मोन्सेरात यांनी सांगितले.