१९ वर्षीय युवा कायलिन एमबापेने पहिल्या सत्रात नोंदविलेल्या गोलाच्या जोरावर फ्रान्सने तुल्यबळ पेरु संघावर १-० अशी निसटती मात करीत आपल्या सलग दुसर्या विजयासह विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम १६ संघात आपले स्थान निश्चित केले आहे. फ्रान्सने ६ गुणांसह गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळविले आहे. तर पराभवामुळे दक्षिण अमेरिकन पेरु संघाचे स्पर्धेतील आव्हान गट फेरीतच संपुष्टात आले.
सामन्यात फ्रान्सने आपल्या नावाला साजेसा खेळ करताना प्रारंभापासूनच खेळावर वर्चस्व राखले होते. जागतिक ७व्या स्थानावर असलेल्या फ्रान्सने ११व्या स्थानावरील पेरु संघावर जोरदार आक्रमणे केली होती. एमबापे, ग्रीझमान आणि मातुडी यांनी पेरुची बचावफळी बर्याचदा भेदली. अखेर ३४व्या मिनिटाला त्यांना यश आले. ३४व्या मिनिटाला फ्रान्सला कॉर्नर किक मिळाली आणि त्याचा पुरेपुर फायदा उठवित युवा एमबापेने अचूकपणे चेंडूला जाळीची दिशा दाखवित संघाचे खाते खोलले. हाच या सामन्यातील एकमेव विजयी गोल ठरला. हा गोल नोंदवित एमबापेने फ्रान्सतर्फे विश्वचषक किंवा युरो कपमध्ये गोल करणारा एमबापे हा सर्वात तरुण खेळाडू बनण्याचा मान मिळविला.
आता गट फेरीतील शेवटच्या सामन्यात फ्रान्स संघाची लढत मंगळवार २६ जून रोजी डेनमार्कशी तर पेरुची लढत त्याच दिवशी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.