पुढील पाच वर्षांसाठी गोव्याच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. मतदान हा आपला घटनादत्त अधिकार आहे आणि आपले एकेक मत राज्याचे हे भवितव्य ठरविण्यात योगदान देणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी जो अभूतपूर्व असा राजकीय गदारोळ चालला, ज्या प्रचंड प्रमाणामध्ये उमेदवारांनी या पक्षातून त्या पक्षामध्ये उड्या घेतल्या, ते पाहून व्यथित झालेल्या मतदारांमध्ये कशाला या स्वार्थी, मतलबी लोकांना मत द्यायचे अशी एक नकारात्मकता सर्रास निर्माण झालेली यावेळी दिसते आहे. कोरोनाचा प्रकोप आणि हे गढूळ, गलीच्छ राजकीय वातावरण यामुळे सर्वसाधारण मतदार मतदानाविषयी यावेळी बराच अनुत्सुक दिसतो आहे. जनतेचा त्यात दोष निश्चितच नाही, परंतु तरीही केवळ आपल्या गोव्याला त्यातल्या त्यात चांगले लोकप्रतिनिधी मिळवून देण्यासाठी आज आपण मतदानासाठी न चुकता बाहेर पडायचे आहे. विक्रमी संख्येने मत नोंदवायचे आहे. भोवतीचा कोविडचा विळखा कागदोपत्री दूर झाल्यासारखा दिसत असला तरी प्रत्यक्षात सुरूच असलेले मृत्यूसत्र लक्षात घेता तो अद्याप दूर हटलेला नाही. त्यामुळे काळजीपूर्वक आणि कोविडविषयक सर्व खबरदारी घेऊन आपला मताधिकार आज कोणत्याही जाहिरातबाजीला आणि बाह्य भपक्याला, आमिषांना, जातीपातींच्या आवाहनांना न भुलता अत्यंत विचारपूर्वक बजावायचा आहे.
यावेळची निवडणूक ही मागील अनेक निवडणुकांपेक्षा बरीच वेगळी आणि कमालीच्या अटीतटीची आहे. किमान बारा राजकीय पक्ष आणि असंख्य अपक्ष या निवडणुकीच्या रिंगणात यावेळी उतरलेले आहेत आणि एकमेकांना शह – काटशह देण्याचे त्यांचे प्रयत्न अगदी निवडणुकीआधीपासूनच चालले आहेत. एकमेकांचे आमदार आणि उमेदवार पळवण्यापासूनच ही लढाई सुरू झालेली आहे. परिणामी बहुतेक मतदारसंघांमध्ये लढती चुरशीच्या आणि अटीतटीच्या आहेत. त्या एकतर्फी होण्याची चिन्हे नाहीत. एकेका उमेदवाराचा आणि राजकीय पक्षाचा कस या निवडणुकीत लागणार आहे हे स्पष्टच आहे. गेल्या पाच वर्षांतील विद्यमान सरकारची आणि विरोधी पक्षांची कामगिरी, मतदारांना आकृष्ट करण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी दिलेली मोफत गोष्टींची वारेमाप आश्वासने, निवडणुकीला स्थानिक आणि भायले पक्ष असे स्वरूप देऊन मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचे झालेले पद्धतशीर प्रयत्न, काही उमेदवारांचे मतदारसंघ ही आपली कौटुंबिक जहागीर असल्यागत वावरणे आणि आजूबाजूच्या मतदारसंघांवर आपलाच प्रभाव ठेवण्याची चाललेली काहींची धडपड ही सगळी या निवडणुकीची पार्श्वभूमी मतदारांना अर्थातच ज्ञात आहे. यातून आपले आणि राज्याचे भलेबुरे कशात आहे हे जाणण्याइतपत गोमंतकीय मतदार नक्कीच सुज्ञ आहे आणि वेळोवेळी त्याने आपली ही राजकीय समज मतपेटीतून व्यवस्थित व्यक्त केलेली आहे. त्यामुळे यावेळीही गोमंतकीय मतदाराची ही राजकीय समज मतदानयंत्रातून व्यक्त होईल असा विश्वास वाटतो. बहुतेक मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढती होणार असल्याने प्रत्येक मताला यावेळी महत्त्व असणार आहे. त्यामुळे आपले मत कोणत्याही प्रलोभनांना, प्रभावांना बळी न पडता शांतचित्ताने व विचारपूर्वक द्यावे असे आवाहन आम्ही आपल्याला करू इच्छितो.
या निवडणुकीनंतर राज्याला स्थिर, विकासाभिमुख आणि जनकल्याणकारी सरकार मिळावे अशी अपेक्षा आहे. परंतु हे स्थैर्य तत्त्वशून्य तडजोडी आणि स्वार्थी, मतलबी पक्षांतरांच्या आधारे मिळवलेेले नसावे. केवळ भौतिक विकास मतदारांना नको आहे. मूल्ये, नीतीमत्ता, तत्त्वांना तिलांजली देऊन केलेला विकास काय कामाचा? स्वार्थासाठी, सत्तेसाठी वाट्टेल तेथे वाट्टेल तशा उड्या मारणार्यांना अद्दल घडवायची ही वेळ आहे. भ्रष्टाचारी, लाचलुचपतकारी, स्वार्थी आणि मुजोर मंडळींना त्यांची खरी जागा दाखवून द्यायची ही वेळ आहे. नेतेगिरीचे मुखवटे धारण करून निवडणुकीत उतरलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या चारित्र्यहीन लोकांना घरी बसवायची ही वेळ आहे. कोणी निवडणुकीनंतर केवळ स्वार्थासाठी इकडून तिकडे उड्या मारू पाहणार असेल तर अशाला डोके वर काढण्याची संधीच या निवडणुकीत मिळू नये. दूरच्या दिव्यांना न भुलता आणि केवळ पक्षबिक्ष न पाहता तत्त्वनिष्ठ, सत्शील, विचारशील उमेदवारांच्या पाठीशी गोव्याचा मतदार उभा राहिला तरच या निवडणुकीच्या मंथनातून गोव्याच्या भल्याचे असे काही घडू शकेल. राजकीय क्षेत्रामध्ये काही चांगले घडायला हवे असेल तर केवळ चांगली, प्रामाणिक, स्वच्छ चेहर्याची माणसे हवी आहेत. निव्वळ पैसा, प्रलोभने, पक्षप्रेम, प्रचारसामर्थ्य यांना न भुलता आपापल्या मतदारसंघातील अशा उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायचे आहे. त्यांचे हात बळकट करायचे आहेत. एक मतदार म्हणून आपले हे कर्तव्य आहे. ही आपली जबाबदारी आहे. शेवटी जे पेराल, तेच उगवेल!