पेपर चोरी प्रकरणी सहाय्यक प्राध्यापक निलंबित

0
2

>> गोवा विद्यापीठाच्या कुलगुरुंची कारवाई; प्रकरणाच्या चौकशीसाठी सत्यशोधन समितीला 48 तासांची मुदत; पोलिसांत तक्रार दाखल

गोवा विद्यापीठातील भौतिक विज्ञान विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रणव नाईक यांना भौतिक विज्ञानाच्या प्रश्नपत्रिका (पेपर) चोरी प्रकरणी काल निलंबित करण्यात आले. त्यांच्या निलंबनाचा आदेश गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन यांनी काढला. या प्रकरणी डॉ. प्रणव नाईक यांच्याविरुद्ध आगशी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आलेली आहे. डॉ. प्रणव नाईक यांच्यावर एका विद्यार्थिनीसाठी सहकारी प्राध्यापकांचे लॉकर बनावट किल्ल्यांचा वापर करून उघडून प्रश्नपत्रिका चोरून त्या तिला पुरवल्याचा गंभीर आरोप आहे. प्राध्यापकाच्या निलंबनाबरोबरच प्रकरणाच्या चौकशीसाठी सत्यशोधन समिती नेमण्यात आली असून, तिला तपासासाठी 48 तासांची मुदत दिली आहे.

सदर प्रश्नपत्रिका चोरीचे प्रकरण सप्टेंबर महिन्यात घडले होते. डॉ. प्रणव नाईक यांनी एका विद्यार्थिनीला भौतिक विज्ञानाची प्रश्नपत्रिका परीक्षेआधीच पुरवली होती. त्या परीक्षेत संबंधित विद्यार्थिनीला चांगले गुणही मिळाले होते. मात्र त्यानंतरच्या परीक्षेत ती विद्यार्थिनी अनुत्तीर्ण झाली अन्‌‍ हे प्रकरण चर्चेत आले; मात्र त्यावेळी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला.

आता या प्रकरणाचा भांडाफोड झाल्यानंतर काशिनाथ शेट्ये यांच्यासह एनएसयूआयनेही या प्रकरणी आगशी येथील पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. तसेच गोवा विद्यापीठाने या प्रकरणी 48 तासांच्या आत चौकशी करून गुन्हा नोंदवला नाही, तर न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता.
या प्रकरणी सर्व स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर गोवा विद्यापीठाने सोमवारी डॉ. प्रणव नाईक यांना निलंबित केले. तसेच या एकूण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक सत्यशोधन समिती देखील स्थापन केली. सदर समितीला येत्या 48 तासांच्या आत अहवाल देण्याची सूचना करण्यात आली आहे, असे काल गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन यांनी गोवा विद्यापीठात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. समितीचा अहवाल हाती आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे मेनन यांनी सांगितले.

विविध विद्यार्थी संघटनांचे आंदोलन
प्रश्नपत्रिका चोरीचा माध्यमांतून भांडाफोड झाल्यानंतर विविध विद्यार्थी संघटनांनी या प्रकरणी आवाज उठवला, त्यात एनएसयूआय, अभाविप तसेच गोवा फॉरवर्ड विद्यार्थी विभाग आदी विद्यार्थी संघटनांचा समावेश होता. अभाविपने गोवा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत मोर्चा नेऊन या प्रकरणी विनाविलंब कारवाईची मागणी केली; मात्र कुलगुरू हरिलाल मेनन यांनी या प्रकरणी कारवाई करण्याचे आश्वासन देतानाच आपणाकडे या प्रकरणी कोणतीही तक्रार आली नसल्याचे सांगितले. त्यानंतर एनएसयूआयने या प्रकरणी आगशी पोलिसात तक्रार नोंदवली.

कुलगुरुंनी प्रश्नपत्रिका चोरीचा आरोप अप्रत्यक्षरित्या फेटाळला
प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणी अद्याप आपणाकडे कुणीही तक्रार केलेली नाही, असे पत्रकार परिषदेत कुलगुरुंनी नमूद केले. याशिवाय प्रश्नपत्रिका चोरी झालीच नव्हती, असेही त्यांनी अप्रत्यक्षरित्या आपल्या स्पष्टीकरणानंतर सांगण्याचा प्रयत्न केला. प्रणव नाईक यांनी आपल्या विभागातील काही सहकाऱ्यांची केबिन्स काही रसायने नेण्यासाठी उघडली होती. प्रयोगांसाठी ही रसायने हवी होती. मात्र, परवानगी न घेता त्यांनी ही केबिन्स उघडल्याने वाद निर्माण झाला होता. मात्र, नाईक यांनी त्याबाबत माफी मागितल्यानंतर प्रकरण मिटले होते, असा दावा कुलगुरुंनी केला.

राज्यपालांनी कुलगुरुंकडून अहवाल मागवला
गोवा विद्यापीठातील प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणाची आता राज्यपाल तथा कुलपती पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी देखील दखल घेतली असून, त्यांनी कुलगुरू हरिलाल मेनन यांच्याकडून संपूर्ण सविस्तर अहवाल मागवला आहे.

संबंधित विद्यार्थिनीवरही कारवाई करा : अभाविप
गोवा विद्यापीठाच्या चौकशी समितीच्या अहवालात जर प्रश्नपत्रिका चोरीचे प्रकरण सिद्ध झाले, तर संबंधित सहाय्यक प्राध्यापकावर कारवाईबरोबरच ज्या विद्यार्थिनीला त्याचा फायदा झाला, तिचे मागील सेमिस्टरचे गुण रद्द करून तिच्यावरही कारवाई केली जावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे.