>> तीन ट्रक, तीन स्कूटरची एकमेकांना धडक, पाचजण जखमी
करासवाडा चार रस्ता ते पणजी महामार्गावरील पेडे म्हापसा येथे वर्दळीच्या रस्त्यावर काल रविवारी दुपारी 1.15 वाजण्याच्या दरम्यान 6 वाहनांत अपघात झाला. यात 3 ट्रक तसेच 3 दुचाकींचा समावेश होता. या अपघातात सहाजण जखमी झाले. मात्र सुदैवाने प्राणहानी झाली नाही.
जीए 08 व्ही 7507 हा ट्रक पेडणेमार्गे पणजीकडे जात होता. या ट्रकने पेडे मैदानाकडून येणाऱ्या जीए 03 डब्ल्यू 1202 या पाण्याच्या टँकरला धडक दिली. याचवेळी पणजीहून पेडण्याकडे जाणाऱ्या एमएच 46 बीएम 1251 या ट्रकची टँकरला धडक बसली. याचवेळी पेडे मैदानाकडून येणारी एमएच 12 ई 7968 ही व जीए 03 एई 8974 ही या दोन्ही स्कूटर अपघातग्रस्त तिन्ही चारचाकी वाहनाखाली चिरडल्या. यावेळी जीए 03 एडी 0580 या दुचाकीचाही अपघात झाला मात्र ती या अपघातातून बचावली. दरम्यान या अपघातातील दोन दुचाकी ट्रकखाली येऊन चिरडल्या गेल्या. या अपघातात दोन मुलांसह 4 जण जखमी झाले आहेत.
जखमी झालेल्यांमध्ये प्रवीण सातार्डेकर (40), त्यांच्या पत्नी पूर्वी सातार्डेकर (31, दोन्ही म्हापसा), ईअन फर्नांडिस (24, पेडे म्हापसा) मोहनलाल कामी (38, करासवाडा), मनीष कामी (12, करासवाडा) जखमी झाले. जखमींना उपचारासाठी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघातामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यात भर म्हणून ट्रक चालकाच्या अंगावर संतप्त जमावाने धावून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु उपस्थित नागरिकांनी व अपघातस्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्यांना रोखले.