पेडण्यात भीषण अपघात; ३८ प्रवासी बचावले

0
113

मालपे, पेडणे येथे काल पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान प्रवासी बसने मालवाहू ट्रकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पोलीस जीप व कंटेनरसह एकूण चार वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात कंटेनरच्या अलग झालेल्या केबिनमध्ये अडकून पडलेल्या चालकाला अडीच तासांच्या झुंजीनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी कॅबिनचे पत्रे कापून बाहेर काढल्याने त्याचे प्राण वाचले. सुदैवाने या अपघातात बसमधील ३८ प्रवाशांसह अन्य वाहनांतील सगळेजण

बचावले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीए-०८-यू-९२९२ क्रमांकाची प्रवासी बस मुंबईहून म्हापशाकडे चालली होती. बसच्या पुढे एजी-९०-जीई-७६८५ प्लॅस्टिक पाईप्स घेऊन जाणार ट्रक जात होता. तर बसच्या मागे पोलीस जीप व तिच्या मागे एमएच ४३ – वाय – ००५८ क्रमांकाचा कंटेनर येत होता. मालपे राष्ट्रीय महामार्गावर वाहने पोचली असता बसने समोरील पाईपवाहू ट्रकला जोरदार धडक दिली. त्यामुळे बसच्या कॅबिनला छेदून काही पाईप्स बसमध्ये घुसली. त्यावेळी बरेच प्रवासी झोपेत
होते. त्यांनी एकच आरडाओरड केली. बसने ट्रकला धडक देताच कंटेनरची समोरील पोलीस जीपला धडक बसल्याने जीपचा टायर फुटला. जीपला वाचवण्याचा प्रयत्न कंटेनर चालकाने केल्याने कंटेनरचा तोल जाऊन तो रस्त्याच्या मधोमध आडवा झाला. यावेळी कंटेनरची द्विभाजकाला धडक बसल्याने कॅबिन ट्रॉलीपासून वेगळे झाले. मात्र, चालक रामविलास चौधरी केबिनमध्ये अडकून पडला. तो जिवंत असल्याचे कळल्यावर अग्निशमन दलाच्या जवानांनी तीस तास अथक प्रयत्न करून कॅबिनचे पत्रे कापून त्याला सुखरूप बाहेर काढून उपचारासाठी इस्पितळात दाखल केले. या अपघातामुळे तीस तास महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पेडणे पोलिसांनी ती सुरळीत केली.
पेडणे अग्निशमन दलाचे प्रदीप मांद्रेकर, विठ्ठल गावकर, विठ्ठल परब, सहदेव चोडणकर, वासुदेव हळदणकर, महादेव गावस, केतन कामुलकर, प्रशांत शेटगावकर, अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली मदत केली. प्रशांत धारगळकर व समीर कोरगावकर या जवानांनी कामावर नसताना मदतकार्यात भाग घेऊन अडकून पडलेल्या कंटेनरच्या चालकाला वाचविले. यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांचे कौतुक होत आहे.