पेडण्यातील ३७ चिरे खाणींना नोटिसा

0
138

>> तलाठ्यांमार्फत अहवाल तयार करण्यास प्रारंभ

तुये येथील डॉन बॉस्को विद्यालयातील हॉस्टेलमध्ये राहणार्‍या चार विद्यार्थ्यांचा तुये येथील चिरेखाणीत बुडून मृत्यू झाल्यानंतर पेडणे तालुक्यातील चिरेखाणींचा विषय ऐरणीवर आला आहे. पेडणे तालुक्यातील ३७ चिरेखाणींच्या मालकांना जिल्हाधिकार्‍यांनी नोटिसा पाठवल्या आहेत.

तसेच पेडणे तालुक्याचे उपजिल्हाधिकारी व मामलेदार यांनी पंचायत पातळीवर तलाठ्यांना सर्व पंचायत क्षेत्रात ज्या चिरे खाणी आहेत, ती जागा, सर्वे क्रमांक, व्यापलेली जागा यांचा त्वरित अहवाल देण्याचा आदेश दिलेला आहे.
पेडणे तालुक्यातील तुये व पार्से गावातील चिरे खाणींवर लक्ष केंद्रित केले आहे. गावात कुठे चिरे खाणी आहे त्याचा पंचनामा करण्यासाठी तलाठी माळरानात पोहोचलेले आहेत. पार्से तुये व्यतिरिक्त पत्रादेवी, धारगळ, आश्वे – मांद्रे, तोरसे उगवे, मोपा, वारखंड, आगरवाडा, केरी, कोरगाव या भागातही मोठ्या प्रमाणात चिरे खाणी आहेत.

हरित लवादाकडे प्रकरण
पेडणे तालुक्यातील सर्व चिरे खाणी बंद कराव्यात यासाठी हे प्रकरण हरित लवादाच्या न्यायालयात पोचवले आहे. याविषयी मागच्या तीन महिन्यांपूर्वी तालुक्याच्या जिल्हाधिकार्‍यांना या चिरे खाणीचा अहवाल देण्याचा आदेश दिला होता. लोकसभेच्या निवडणुकीच्या काळातच तालुक्याच्या उपजिल्हाधिकारी व मामलेदार यांनी संबधित चिरे खाणी मालकांना नोटीसा पाठवून हजर राहण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर निवडणुकीच्या धामधुमीत या चिरे खाणींवर कारवाई होण्यास विलंब लागला.

खाणींचा अहवाल मागवला
पेडणे तालुका जिल्हाधिकार्‍यांनी नोटिसा पाठवलेल्या चिरे खाण व्यावसायिकांपैकी अनेकांच्या खाणी बंद आहेत तर काही जणांच्या चालू आहेत. यात खाजगी जमिनीत मोठ्या प्रमाणात चिरे खाणी आजही चालू आहेत. त्यामुळे पेडणे मामलेदार अनंत मळीक यांनी तलाठ्यांना गावातील कोणत्या भागात किती चिरे खाणी आणि लोबर काढणार्‍या खाणी यांचा अहवाल लवकर देण्याचा आदेश दिलेला आहे.

तुये डॉन बॉस्कोतील चार विद्यार्थी एकाचवेळी मृत्युमुखी पडल्याने तालुक्यातील चिरे खाणी रडारवर आल्या आहेत. मनुष्याचे बळी घेणार्‍या चिरे खाणींच्या मालकांवर कारवाई करण्यासाठी आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गंभीर दखल घेत कारवाई करण्याचे संकेत दिलेले आहेत. दरम्यान, गावातील चिरेखाणींचा अहवाल तयार करण्याचे काम तलाठ्यांमार्फत सुरू करण्यात आलेले आहे.