पेडण्यातील गोळीबार प्रकरणी दोन व्यावसायिक, 5 कामगारांना अटक

0
3

मुख्य सूत्रधार अजूनही गायबच

पोरस्कडे न्हयबाग येथे तेरेखोल नदीमध्ये रेती व्यवसायातील वादातून दोन कामगारांवर गोळीबार केल्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अजून अटक केली नाही. मात्र पेडणे पोलिसांनी या रेती व्यवसायाशी संबंधित असलेले रॉबर्ट फर्नांडिस व अशोक मुळगावकर हे दोन स्थानिक व्यावसायिक व पाच मजूर असे एकूण सातजणांना अटक केली आहे. पाच मजुरांमध्ये सोनेलाल चौधरी, मुन्ना बिन, सोनू पासवान, विकास बिन व योगेंद्र चौधरी यांचा समावेश आहे.

दरम्यान या गोळीबारप्रकरणी आतापर्यंत ज्यांच्याकडे कायदेशीर परवाने असलेल्या बंदुका होत्या त्यातील 35 लोकांना पोलीस स्थानकावर आणून तज्ज्ञांकडून त्या बंदुकांची पडताळणी केली. शिवाय काल 27 व्यावसायिक व मजुरांना वेगवेगळ्या कारणांसाठी त्यांची चौकशी करून तपास सुरू केल्याची माहिती पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांनी दिली.
मंगळवारी पोरस्कडे उगवे जयतीर्थ या सीमारेषेवर तेरेखोल नदीकिनारी वाळू व्यवसायाशी संबंधित असलेल्या राम ऋषी रामराज पास्वान व लालबहादूर गौड या दोन कामगारांवर एका गटाने गोळीबार केला होता. या घटनेत गोळीबार करणाऱ्या संशयितांपर्यंत अद्याप पोलीस पोहोचलेले नाहीत. तपास वेगाने ः डॉ. सावंत
गृहमंत्री तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे पेडण्यात आले असता प्रस्तुत प्रतिनिधीने या घटनेवबाबत विचारणे केली. त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी, तपास सुरू असून अनेकांच्या जबान्या घेतलेल्या आहे. मुख्य सूत्रधाराला लवकरच पकडले जाईल असे सांगितले.

आणखी 25 कामगारांची चौकशी

बुधवारी 49 मजुरांना रेती व्यावसायिकांना पोलीस स्थानकावर आणून तपास सुरू केला होता. काल गुरूवारी 25 कामगार आणि व्यावसायिकांना बोलावून त्यांची चौकशी केली. परंतु त्यातील दोन रेती व्यावसायिक रॉबर्ट फर्नांडिस व अशोक मुळगावकर यांच्यासहित त्यांच्या पाच कामगारांना पेडणे पोलिसांनी अटक केली.