>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्याकडून जाहीर
लोकांच्या तीव्र विरोधामुळे अत्यंत वादग्रस्त ठरलेला पेडणे तालुक्यासाठीचा क्षेत्रीय नियोजन आराखडा अखेर काल रद्द करण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, तसेच नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी हा आराखडा रद्द केल्याचे जाहीर केले. पाच दिवसांच्या आत हा आराखडा रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा व मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा इशारा पेडण्यातील जनतेने दिल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाला.
याविषयी सविस्तरपणे माहिती देताना मंत्री विश्वजीत राणे म्हणाले की, आम्ही पेडण्याचा क्षेत्रीय नियोजन आराखडा रद्द केलेला असून, त्यामुळे हा आराखडा आता अस्तित्त्वात राहिलेला नाही. यापुढे जेव्हा आम्हाला पेडण्यासाठीचा क्षेत्रीय आराखडा तयार करावा असे वाटेल तेव्हा तो तेथील जनतेशी चर्चा करूनच तयार करण्यात येईल. त्यासाठी आम्ही जनतेला विश्वासात घेऊ.
पेडण्यातील ज्या लोकांची निवासी घरे बागायत जमिनीत आहे, त्या जमिनी निवासी विभागात रुपांतरित करण्याची गरज असून, ते करून लोकांची ही घरे कायदेशीर करण्यात येणार आहेत. खरे म्हणजे बऱ्याच पूर्वी हे व्हायला हवे होते; पण ते झाले नसल्याचे सांगून आता ते काम हाती घेतले जाईल, असे आश्वासन राणे यांनी दिले. पेडण्यातील जनतेच्या इच्छेविरुद्ध आम्हाला ह्या आराखड्याची अंमलबजावणी करायची नाही. त्यामुळे हा आराखडा रद्द केलेला आहे, असेही राणे म्हणाले.
पेडणे तालुका क्षेत्रीय नियोजन आराखड्याचा मसुदा तयार केल्यानंतर नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी ह्या आराखड्यासंबंधीच्या सूचना व हरकती नोंदवण्यासाठी लोकांना एका महिन्याचा अवधी दिला होता; मात्र नंतर ह्या आराखड्याला झालेला जोरदार विरोध लक्षात घेऊन त्यांनी हा आराखडा स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला होता; मात्र मगोचे आमदार जीत आरोलकर, जवळपास 11 पंचायतींनी या आराखड्याला विरोध दर्शवत तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर शेवटी सरकारने हा आराखडा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
पेडण्यातील जनतेला न्याय मिळाला : आरोलकर
पेडण्यातील जनतेला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी राज्य सरकारने पेडण्यासाठीचा क्षेत्रीय आराखडा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दिली. आराखडा रद्द केल्याच्या निर्णयाबद्दल आरोलकर यांनी समाधान व्यक्त केले. तसेच जनतेची मागणी मान्य केल्याबद्दल राणे यांचे आभार मानले. जनतेला विश्वासात घेऊन विकास व्हावा ह्या मताचा आपण असल्याचेही ते म्हणाले.
जनभावना लक्षात घेऊन आराखडा रद्दचा निर्णय : मुख्यमंत्री
पेडणे तालुक्यातील जनतेने केलेली मागणी व त्यांच्या भावना लक्षात घेऊन पेडण्यासाठीचा विभाग आराखडा रद्द करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले. आपले सरकार पेडणे तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे; मात्र तालुक्याचा विकास तेथील जनतेला विश्वासात घेऊनच करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पेडणे तालुक्याच्या क्षेत्रीय आराखड्याच्या प्रश्नी तालुक्यातील लोकांनी बुधवारी मंत्रालयात आपली भेट घेतली होती. आणि वादग्रस्त ठरलेला क्षेत्रीय नियोजन आराखडा रद्द करावा, अशी कळकळीची विनंती आपणाला केली होती. यावेळी आपण पेडण्यातील नागरिकांना राज्य सरकार त्यांच्या विरोधात नाही, असे स्पष्ट केले होते. तसेच त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही आराखडा तयार केला जाणार नसल्याचे वचन त्यांना दिले होते, असेही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर आपण नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्याशी पेडण्याच्या क्षेत्रीय नियोजन आराखड्याविषयी चर्चा केली. आणि त्यानंतर आम्ही स्थानिक लोकांचा विरोध लक्षात घेत हा आराखडा रद्द करण्याचा निर्णय घेतला, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.