पेडणे शेतकरी सोसायटी पुन्हा मिलिंद केरकर यांच्या गटाकडे

0
130
श्री. मिलिंद केरकर यांच्या नेतृत्वाखालील पेडणे तालुका शेतकरी सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक मंडळ

सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या पेडणे तालुका शेतकरी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत संस्थेची गेली २८ वर्षे धुरा वाहत आलेले अध्यक्ष श्री. मिलिंद उमाकांत केरकर यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार मित्र’ गटाने पुन्हा एकवार आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करीत विरोधी गटाचा धुव्वा उडवला. ‘सहकार मित्र’ गटाचे ११ पैकी १० उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. विरोधी शेतकरी सेवा गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.पेडणे तालुका शेतकरी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक रविवारी झाली होती, तिचा निकाल काल सोमवारी जाहीर झाला. त्यात भाग १ मधील संचालकांच्या आठ जागांसाठी, तर भाग २ मधील तीन जागांसाठी एकूण २२६३ मतदान झाले होते. काल म्हापसा येथील उत्तर गोवा सहकार निबंधक कार्यालयात मतमोजणी झाली. भाग १ मधून मिलिंद केरकर यांच्या नेतृत्वाखालील गटाचे सर्वच्या सर्व आठही उमेदवार निवडून आले, तर भाग २ मधून त्या गटातील तीनपैकी दोघेजण निवडून आले, तर एक सदस्य अवघ्या मतांनी पराभूत झाला.
भाग १ मधून निवडून आलेल्यांमध्ये संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मिलिंद केरकर, मोहन बुगडे, दत्ताराम काणेकर, संतोष मळीक, गोपाळ नाईक, रामदास परब, शांबा सावंत, किशोर शेट मांद्रेकर, तर भाग २ मधून विठोबा बगळी व गजानन शेट कोरगावकर हे विजयी झाले. विरोधी गटातून केवळ ज्ञानेश्वर परब हे विजयी झाले.
३५ वर्षांतील कार्याची पावती :केरकर
भागधारकांनी गेल्या ३५ वर्षांतील आपल्या कार्याची पावती देऊन विश्वास दाखवला असे उद्गार संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मिलिंद केरकर यांनी निकालानंतर काढले. या विश्वासास पात्र ठरण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही देताना भागधारकांना येत्या वर्षात सर्वाधिक लाभांश देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. श्री. केरकर हे १९८६-८७ पासून गेली २८ वर्षे संस्थेचे नेतृत्व करीत असून त्यापूर्वीही तीन वर्षे ते संस्थेचे अध्यक्ष होते.