पेडणे पालिकेवर पन्नास लाखांचे कर्ज

0
8

>> वेलमा कंपनीने खटला जिंकल्याने पालिकेला भुर्दंड

पेडणे पालिका मंडळाच्या काल झालेल्या बैठकीत पालिका मंडळावरील पन्नास लाख रुपयांचे कर्ज, वेलमा कन्स्ट्रशन कंपनीने पेडणे पालिकेच्या विरोधात जिंकलेला खटला व त्यामुळे पालिकेला दिलेली नोटीस या विषयांवर चर्चा झाली.

पेडणे पालिकेची बैठक नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली काल सोमवारी झाली. यावेळी नियुक्ती सदस्य म्हणून पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर, उपनगराध्यक्ष अश्विनी पालयेकर, पालिकेचे मुख्याधिकारी अनिल राणे सरदेसाई, नगरसेविका उषा नागवेकर, नगरसेविका राखी कशालकर, नगरसेविका विशाखा गडेकर, नगरसेविका तृप्ती सावळ देसाई, नगरसेवक विष्णू साळगावकर, नगरसेवक माधव शेणवी देसाई, नगरसेवक मनोज हरमलकर, नगरसेवक शिवराम तुकोजी यावेळी उपस्थित होते.
यावेळी आमदार आर्लेकर यांनी विविध सूचना केल्या. यावेळी दुकानदारांना सोपो कराकरता परवाना देऊन कर घेण्याविषयी चर्चा करण्यात आली.

वेलमा कन्स्ट्रक्शन कंपनीला बसस्थानकाचे कंपनीने 2012 साली जागा सफाई आणि काम केल्याप्रकरणी पालिका सुमारे 18 लाख रुपये देणे होते. ते तत्कालीन पालिका मंडळाने दिले नसल्याने सदर कंत्राटदराने पालिकेविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला होता. तो खटला वेलमा कंपनीने जिंकला असून व्याजासह आता पेडणे पालिकेला खटल्यानुसार 50 लाख रुपये देणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे पेडणे पालिका मंडळावर पन्नास लाख रुपयांचा बोजा असून याबाबतीत पालिका मंडळाला चिंता सतावत आहे. यावर पालिका मंडळात चर्चा करुन पालिका संचालनालयाला पत्र पाठवून याबाबत सहकार्य करण्याची मागणी करणारा ठराव घेण्यात आला. कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी एका मोटरची चोरी झाल्याने त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवणे तसेच पेडणे पालिका क्षेत्रात भुरट्या चोरांपासून संरक्षण मिळण्यासाठी काही ठिकाणी गृहखात्याला पत्र पाठवून सीसीटीव्ही बसवण्याची मागणी करावी असा निर्णय घेण्यात आला.

वेतनाचा प्रश्न
कर्मचाऱ्यांना गेले तीन महिने पगार नाही. यावर तोडगा काढण्यासाठी जी थकबाकी आहे तिथे वेळोवेळी वसुली करावी अशी सूचना यावेळी बैठकीत केली. कर्मचाऱ्यांचा भविष्य निधी तसेच इतर जी कामे आहेत आणि इतर ज्या सुविधा मिळणार आहेत त्यासंबंधी सोपस्कार पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी बैठकीत नगराध्यक्षांनी दिल्या.
यावेळी आमदार आर्लेकर यांनी संबंधित कर्मचाऱ्याला काम वेळेत करण्याचे निर्देश दिले.