पेडणे तालुका व कदंब पठार येथे जमीन विभाग नकाशे तयार करण्याचे आदेश राज्य सरकारने नगरनियोजन खात्याला दिले असल्याची माहिती या खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना दिली. नगर-नियोजन कायद्यातील तरतुदींनुसार हे विभाग नकाशे तयार करण्यात येणार असल्याचे राणे म्हणाले. त्यासाठी एका आंतरराष्ट्रीय सल्लागाराची मदत घेण्याबरोबरच विविध संबंधितांचीही मदत घेण्यात येणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
गोवा नगर-नियोजन (दुरुस्ती) विधेयक २०२२ नुसार पंचायत व नगरपालिका क्षेत्रातील विकास साधण्यासाठी विभाग नकाशे तयार केले जात आहेत. आता ते बाह्य विकास आराखड्याखाली आणण्यात आले आहेत. प्रादेशिक आराखड्याचा विचार करून त्या दृष्टीने हे विभाग नकाशे तयार करण्यात येतील, असेही राणे यांनी स्पष्ट केले.