पेट्रोल महागणार

0
101

मूल्यवर्धीत कर पुन्हा लागू करण्याचा सरकारचा निर्णय

राज्याची आर्थिक स्थिती बिकट बनल्याच्या पार्श्‍वभूमीवर भाजप सरकारने काल रद्द केलेला पेट्रोलवरील ५ टक्के मूल्यवर्धीत कर पुन्हा लागू करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे प्रती लिटर पेट्रोलचा दर सुमारे ५६ रुपये होऊ शकेल. सध्या पेट्रोलचा दर प्रती लिटर रु. ५२.५७ पैसे आहे.भाजपने गेल्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात स्वस्थ दरात पेट्रोल उपलब्ध करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याची पूर्तता करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पेट्रोलवरील मूल्यवर्धीत कर रद्द केला होता. त्यामुळे राज्यातील वाहन चालकांना दिलास मिळाला होता. सर्वसामान्य जनतेने कर रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले होते. आता पेट्रोलचे दर घसरले आहेत. चलन फुगवट्यावरही नियंत्रण आले आहे. त्यामुळे वरील मूल्यवर्धीत कर रद्द करण्याची गरज नाही. राज्याच्या हितासाठीच आपण वरील निर्णय घेत असून जनता सरकारला समजून घेतील, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. मूल्यवर्धीत कर रद्द केल्याने राज्याच्या तिजोरीवर बराच परिणाम झाला होता. खाण व्यवसाय बंद झाल्यानेही राज्याचा २५ टक्के महसूल बुडाला, नुकसानी भरून काढण्यासाठी सरकारनेच अनेक नवे स्रोत शोधून काढल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. पेट्रोलवरील मूल्यवर्धीत कराच्या रुपाने मिळणारा महसूल राज्याच्या विकासासाठी वापरणे शक्य होईल, असे पार्सेकर म्हणाले. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीत ७० ते ७५ कोटी रुपयांची भर पडणार आहे.
महिला पोलीस भ्रष्टाचार रोखू शकतात : मुख्यमंत्री
पोलीस खात्यात महिला पोलिसांची संख्या वाढल्यास खात्यातील भ्रष्टाचाराचे प्रमाण बर्‍याचअंशी कमी होईल, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. जनतेच्या प्रश्‍नावर महिला नेहमीच गंभीर असतात. पोलीस दलात महिलांची संख्या वाढविल्यानंतर या खात्याला लागलेला भ्रष्टाचाराचा डाग पुसून जाईल, असे पार्सेकर म्हणाले.
ज्येष्ठ नागरिकांसाठी मदतवाहिनी सुरू करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते. महिला पोलिसांच्या तुकडीने मुख्यमंत्र्यांना सलामी दिली. पोलीस खात्यात काही ‘ब्लॅकशीप’ आहेत त्यांच्यामुळेच खात्याची प्रतिमा मलीन होते.
बिटवर जाणार्‍या पोलिसांना वेगवेगळ्या वसाहतीतील ज्येष्ठ नागरिकांची यादी तयार करण्यास सांगितल्याचे पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांनी सांगितले. पोलीस नियंत्रण कक्षातर्फे ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय मदतही पुरविणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पाणी व विजेची बिले भरण्यासाठीही मदत मिळेल, असेही ते म्हणाले.