पेजर, वॉकीटॉकीच्या स्फोटांमागील गूढ

0
4
  • शंतनू चिंचाळकर

‘अँड्रॉइड’ आणि ‘आयफोन’सारख्या आधुनिक संपर्क तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना संपूर्ण लेबनॉनमध्ये पेजर, वॉकीटॉकी तसेच घरातील सौरऊर्जा प्रणालींमध्ये स्फोट घडवले गेले. एखाद्या संस्थेची, सरकारी खात्याची, देशाच्या संरक्षणप्रणालीची वेबसाईट हॅक करून गोपनीय माहिती हस्तगत केली जाते, तसेच पेजरप्रणालीचा ताबा घेऊन हे स्फोट घडवून आणले गेले. या गूढरम्य हल्ल्यांचा खास वेध…

12 मार्च 1993 या दिवशी मुंबई महानगरात वर्दळीच्या 11 ठिकाणी झालेले साखळी बॉम्बस्फोट आज आठवतात. एकाच वेळी एकाच शहरात झालेल्या अनेक स्फोटांनी अख्खा देश हादरून गेला होता. अतिरेक्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन, जेवणाच्या डब्यात बॉम्ब ठेवून, टायमरने घडवून आणलेले हे स्फोट आपण समजू शकतो, एक वेळ शत्रुराष्ट्राच्या जमिनीवरून केलेले रॉकेट हल्ले आपण समजू शकतो; पण ‘अँड्रॉइड’ आणि ‘आयफोन’सारख्या आधुनिक संपर्क तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना संपूर्ण लेबनॉनमध्ये पेजरसारख्या आऊटडेटेड डिव्हाईसद्वारे, वॉकीटॉकीद्वारे शेकडो साखळी स्फोट घडवून आणले गेले. त्यावर कडी म्हणजे बैरूतच्या अनेक भागात घरातील सौरऊर्जा प्रणालींचेही स्फोट घडवले गेले. हे स्फोट कोणी आणि कसे घडवून आणले हा लेबनानसाठी अभ्यासाचा विषय असला तरी संपूर्ण जगाच्या आणि खासकरून आपल्या देशाच्या दृष्टीने हा गंभीर विषय आहे. काही तज्ज्ञांच्या मते, एखाद्या संस्थेची, एखाद्या सरकारी खात्याची, तर कधी देशाच्या संरक्षणप्रणालीची कॉम्प्युटर साईट हॅक करून तिच्या कार्यक्षमतेत अडथळे आणले जातात, महत्त्वाची आणि गोपनीय माहिती हस्तगत केली जाते. त्याप्रकारे पेजरप्रणालीचा ताबा घेऊन हे स्फोट घडवून आणले असावेत. यात तथ्य असेल तर संशयाची सुई आपोआप इस्रायलची गुप्तचर संघटना ‘मोसाद’कडे वळते. कारण आज जगातली सर्वात कार्यक्षम गुप्तचर यंत्रणा म्हणून या संघटनेचे नाव घेतले जाते आणि लेबनॉनमधील ‘हिजबुल्लाह’ या अतिरेकी संघटनेला इस्रायलची शत्रू मानले जाते. या संघटनेचे अतिरेकी कालबाह्य झालेल्या पेजरप्रणालीचा अजूनही वापर करतात ही गुप्त माहिती हीच संघटना हॅक करू शकते, असे या तज्ज्ञांचे मत आहे.
अवघे जग आज युद्धाच्या रणात इस्रायलचे भय बाळगून आहे. या राष्ट्राने युद्धतंत्रात तसेच शत्रूंचा सूड उगवण्याच्या बाबतीत बरीच मोठी मजल मारली आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही इस्रायलचे नाव कौतुकाने घेतले जाते. अशा या राष्ट्राने शत्रुराष्ट्राच्या हृदयात धडकी भरेल अशा पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करत लष्करी कारवाया केल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून अरब राष्ट्रे अधूनमधून इस्रायलची खोड काढतात, या देशावर छोटे-मोठे हल्ले करतात. मात्र त्यानंतर त्यांना मोठ्या हल्ल्यांना सामोरे जावे लागते. इस्रायल त्यांना नेस्तनाबूत करणारे उत्तर देतो.

गेल्या वर्षी ‘हमास’ या अतिरेकी संघटनेने इस्रायलवर गनिमी पद्धतीने हल्ला करत अनेक नागरिकांना उचलून नेऊन गाझापट्टी आणि अन्य प्रांतांमध्ये ओलिस ठेवले. या बदल्यात इस्रायलवर सूड उगवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र ‘हमास’ला धडा शिकवण्याबरोबरच अशा कृत्यांना पाठिंबा देणाऱ्या लेबनॉनच्या ‘हिज्बुल्ला’ या अतिरेकी संघटनेलाही इस्रायलने तडाखा दिला. ही संघटना आपल्या देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आणत असल्याचा आरोप करत तिचे अनेक मोहरे टिपायला सुरुवात केली. आपल्या देशाविरुद्ध कट रचणाऱ्यांना धडा शिकवण्याचा एक प्रयत्न म्हणून लेबनॉनमध्ये ठरावीक लोकांकडे असलेल्या पेजर, वॉकीटॉकी किंवा सौरप्रणालींमध्ये स्फोट घडवून आणण्याचे थक्क करणारे कसब इस्रायलने दाखवून दिले आहे.

काही तज्ज्ञांच्या मते, पेजरप्रणाली इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसमार्फत चालते. रेडिओ सिग्नल्सना मॅसेजमध्ये रूपांतरित करणारे तंत्रज्ञान त्यात वापरले गेले आहे. तेव्हा ती डिजिटल डिव्हाईसमार्फत चालणाऱ्या प्रणालीसारखी हॅक करणे शक्य नाही. एक गोष्ट निश्चित, हे कृत्य कोणाचेही असले तरी एकाच देशात, एकाच वेळेस पेजर, वॉकीटॉकी आणि सौरऊर्जा प्रणाली या तीन वेगवेगळ्या घटकांमागील तंत्रज्ञान वापरून मानवाने आपल्या सुविधांसाठी लावलेले शोध स्फोट घडवून आणण्यासाठी वापरले गेले. या हल्ल्यांमध्ये टार्गेट केलेली साधने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बनवलेली नाहीत आणि आज त्यांचा वापरही मर्यादेपुरताच होत असलेला दिसतो. आज पेजरची आधुनिक आवृत्ती म्हणून स्मार्टफोन, आयफोन यांचे शोध लागले आहेत. आज बहुतेक व्यक्ती त्यांचा वापर करतात. आणि हीच जगाच्या दृष्टीने गंभीर म्हणण्यासारखी बाब आहे. आज आपल्या देशाची लोकसंख्या एक अब्ज चाळीस कोटींच्या आसपास आहे. किमान 35 टक्के लोकसंख्या ही डिजिटल डिव्हाईसमार्फत चालणाऱ्या स्मार्टफोनचा वापर करते. अशा स्मार्टफोनना टार्गेट करून ही स्मार्टफोनप्रणाली शत्रुराष्ट्र अथवा अतिरेकी संघटनांकडून अशा पद्धतीने हॅक केली गेल्यास कल्पनाही करवत नाही अशी भयंकर हानी इथे घडवून आणली जाईल. नव्हे, काही संहारक बुद्धिजीवी या कार्याला लागलेसुद्धा असतील!
आजवर भारतात ‘आयएसआय’, ‘लष्कर ए तोयबा’, ‘हिजबुल मुजाहिद्दीन’सारख्या अतिरेकी संघटनांकडून काश्मीर, दिल्ली, मुंबई आणि अगदी पुण्यातसुद्धा बॉम्बस्फोट केले गेले. आज अशा घटनांचे प्रमाण अगदी नगण्य झाले आहे. याचे सगळे श्रेय आपल्या गुप्तचर खात्याला जाते. कारण आपल्या हस्तकांमार्फत आणि स्मार्टफोनवर अतिरेक्यांच्या चालत असलेल्या संभाषणाद्वारे, संदेशवहनाद्वारे त्यांचे अतिरेकी मनसुबे आपले गुप्तचर खाते उधळून लावत असते. पण अलीकडच्या काळात लेबनॉनमध्ये होत असलेले साखळी बॉम्बस्फोट हे देशाच्या संरक्षण आणि गुप्तचर खात्यांसाठी चिंतेची म्हणावी अशी बाब आहे. एक तर हे स्फोट करण्यामागे कोणाचा हात आहे, ते करत असताना नक्की कोणती प्रणाली वापरली गेली आणि पेजरसारख्या कालबाह्य आणि इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसमार्फत हे कसे शक्य झाले, या गोष्टी गंभीरपणे विचार करायला लावणाऱ्या आहेत.

11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेच्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वर हल्ला होऊन त्याच्या दोन्ही उत्तुंग इमारती जमीनदोस्त केल्या गेल्या. त्यावेळी अतिरेक्यांना विमान चालवण्याचे प्रशिक्षण दिले गेले होते. परदेशी भूमीवर जाऊन नियोजनबद्ध पद्धतीने केले गेलेले ते हल्ले पाहून त्यावेळी दहशतवादाची खाण असलेल्या पाकिस्तानकडे असलेली अण्वस्त्रे अतिरेक्यांच्या हाती लागण्याची चिंता व्यक्त केली गेली होती. आज पुन्हा जगाला, खासकरून भारताला त्याच काळजीने ग्रासले असल्यास नवल नाही.

लेबनॉनमध्ये स्फोट घडवून आणण्यासाठी वापरले गेलेले अज्ञात तंत्रज्ञान अतिरेकी आत्मसात करू शकले तर आपल्या देशाच्या सार्वजनिक मालमत्तेची आणि मानवी जिवांची अपरिमित हानी घडवून आणली जाईल. आणि ते विनाशकारी तंत्रज्ञान ‘अँड्रॉइड’ स्मार्टफोन, ‘आयफोन’मधील प्रणालीला हॅक करून वापरले गेल्यास सगळे जग हादरवून टाकले जाईल. कारण आजच्या आधुनिक युगात घरोघरी स्मार्टफोन वापरले जातात. या स्फोटांमागील आधुनिक तंत्रज्ञान लवकरच समोर येईल. ते अतिरेकी संघटनांपर्यंत पोहोचल्यास जगाची काय अवस्था होईल याची कल्पनादेखील करवत नाही. दोन राष्ट्रांमधील युद्धात हॅंडग्रेनेड, बॉम्ब, क्षेपणास्त्रे यांचा वापर केला जातो. 1938 मध्ये संहारक अण्वस्त्रांचा शोध लागला. कैक देश आज अण्वस्त्रसंपन्न झाले. पण त्यांचा वापर फक्त अमेरिकेने दोन वेळा केला. आजवर ते तंत्रज्ञान वापरून कोणीही समोरच्या शत्रुराष्ट्राची अपरिमित हानी केली नाही. कारण दोन राष्ट्रांचे आपापसात कसेही संबंध असले तरी बाह्य जगाला अशा कृतीबाबत उत्तर द्यायची बांधिलकी बहुतेक राष्ट्रे पाळतात. काही राष्ट्रांनी युद्धात रासायनिक अस्त्रांचा वापर केल्याचे आरोप झाले. पण ते तथ्यहीन होते. अतिरेकी कारवायांमध्ये ‘आरडीएक्स’, ‘टीएनटी’सारखी संयुगे वापरली जातात. त्यांना प्रत्यक्ष हल्ले म्हणता येईल. त्यातून होणाऱ्या हानीची व्याप्ती ठरावीक ठिकाणापुरती मर्यादित असते. लेबनॉनमध्ये स्फोट घडवून आणताना वापरले गेलेले तंत्रज्ञान एका देशाने आपल्या शत्रू अतिरेकी संघटनेविरुद्ध वापरले, असा प्राथमिक संशय आहे. पण हेच तंत्रज्ञान हाती लागल्यास अतिरेकी संघटना त्याचा कुणाविरुद्ध वापर करतील याची काहीच शाश्वती नाही.
एक गोष्ट नक्की, आपल्या देशाची गुप्तचर संघटना आणि संरक्षण यंत्रणेला यापुढे अधिक कार्यक्षमतेने कार्य करावे लागेल आणि सामान्य जनतेला कुठल्याही क्षणी बसू शकणाऱ्या अनपेक्षित हादऱ्यांना सामोरे जायचे बळ बाळगून राहावे लागेल.