पॅलेस्टाईनला भारताकडून मानवतावादी मदत

0
18

>> एकूण 38 टन साहित्य घेऊन 17 विमाने रवाना

भारताने पॅलेस्टाईनमधील युद्धपीडित नागरिकांसाठी 38 टन मानवतावादी साहित्याची मदत पाठवली असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी दिली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी याबाबत माहिती देताना, पॅलेस्टाईनमधील लोकांसाठी सुमारे 6.5 टन वैद्यकीय मदत आणि 32 टन आपत्ती निवारण साहित्य घेऊन 17 विमान इजिप्तमधील अल-अरिश विमानतळावर रवाना झाल्याचे सांगितले. यात जीवन रक्षक औषधे, शस्त्रक्रियेच्या वस्तू, झोपण्यासाठी तंबू, पिशव्या, ताडपत्री, स्वच्छताविषयक उपयुक्तता आणि इतर आवश्यक वस्तूंसह पाणी शुद्धीकरण गोळ्यांचा समावेश आहे.

गाझा पट्टीवरून हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलकडून गाझा पट्टी सील करण्यात आली होती. तसेच, तिथे इंधन, पाण्यासह इतर मानवतावादी साहित्यांचीही नाकाबंदी करण्यात आली होती. अखेर, शनिवारी इजिप्त आणि गाझा पट्टी दरम्यानची सीमा इस्रायलने दोन आठवड्यांनंतर खुली केली. त्यामुळे युद्धग्रस्त पॅलेस्टिनी नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक अशा मदत सामुग्रीची वाहने गाझा पट्टीत दाखल झाली आहेत.

इंधनासह सर्व साहित्यांच्या गाड्यांना सीमेवरच अडवण्यात आल्याने गाझातील नागरिकांची कोंडी झाली होती. तेथील पॅलेस्टाईन नागरिकांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू होता. गाझा पट्टी आणि इजिप्तमधील सीमेवर आधीपासूनच संयुक्त राष्ट्राने पाठवलेल्या सुमारे तीन हजार टन मदत सामुग्रीचे ट्रक उभे होते. शनिवारी ही सीमा खुली झाल्यावर हे ट्रक गाझाच्या दिशेने निघाले. सध्याच्या युद्धग्रस्त गाझातून सुटका करून घेण्यासाठी हजारो नागरिक इजिप्तमध्ये जाण्याच्या प्रतीक्षेत सीमेवर आहेत. मदत सामुग्रीच्या 20 वाहनांना प्रथम इजिप्त सीमेवरून इस्रायलने वेढा दिलेल्या गाझा पट्टीत प्रवेश देण्यात आला असून या वाहनांमध्ये जीवरक्षक साहित्याचा समावेश असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.

दरम्यान, इजिप्त आणि गाझा पट्टी दरम्यानची सीमा इस्रायलने सुरू केल्यानंतर पॅलेस्टाईन नागरिकांसाठी मदतीचा ओघ वाढू लागला आहे. परंतु, ही मदत सामुग्री गाझामधील मानवी संकटाच्या तीव्रतेच्या तुलनेत तुटपुंजी असल्याचे मदत पथकांतील स्वयंसेवकांनी सांगितले. त्यामुळे आता भारतानेही मदत पाठवली आहे.
गाझामध्ये सुमारे 23 लाख पॅलेस्टाईन रहिवासी आहेत. त्यांच्यापैकी निम्म्यांनी दक्षिणेकडे स्थलांतर केले आहे. उर्वरित लोक अन्नधान्य पुरवून खात आहेत. तसेच अशुद्ध पाणी पीत आहे. रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सामग्रीचा आणि जनित्रांसाठी इंधनाचा तुटवडा जाणवत असल्याची स्थिती आहे.

वेस्ट बँकमधील मशिदीवर इस्त्रायलचा एअर स्टाईक

हमास आणि पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद दहशतवादी हल्ल्यांची योजना आखण्यासाठी वेस्ट बँकमधील मशिदीच्या खाली कपाऊंड तयार करण्यात आले होते. या कंपाऊंडवर इस्रायलने रविवारी हवाई हल्ला केला. यात एका पॅलेस्टाईन नागरिकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहेत. इस्रायलने गाझा पट्टीवर आपला हल्ला तीव्र करण्याची तयारी केली आहे. गाझा पट्टीतील मृतांची संख्या 4469 झाली आहे तर इस्रायलवरील हमासच्या हल्ल्यात 1400 लोक मारले गेले आहेत.