पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 भारतीय स्पर्धक तिरंग्याची शान उंचावणार…

0
17
  • सुधाकर रामचंद्र नाईक

प्रतिष्ठेच्या ऑलिम्पिक गेम्सना गेल्या शुक्रवार दि. 26 पासून फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सुरुवात झाली आहे. 11 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या भव्यतम जागतिक ॲथलेटिक्स क्रीडामेळ्यात 206 देशांचे 10 हजारांहून अधिक अव्वल स्पर्धक 33 क्रीडा-प्रतियोगितांत पदकप्राप्तीसाठी आपले कौशल्य पणास लावणार आहेत. भारताचा 117 सदस्यीय चूम पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भाग घेणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकलेला भारत विद्यमान प्रतियोगितेत पदकांचा आकडा दुहेरी बनवील अशी अशा बाळगूया!

प्रतिष्ठेच्या ऑलिम्पिक गेम्सचा शुभारंभ- चित्तवेधक आणि विस्मयकारी सोहळ्यासह- गेल्या शुक्रवार दि. 26 पासून फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये झालेला आहे. 11 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या भव्यतम जागतिक ॲथलेटिक्स क्रीडामेळ्यात 206 देशांचे 10 हजारांहून अधिक अव्वल स्पर्धक 33 क्रीडा-प्रतियोगितांत पदकप्राप्तीसाठी आपले कौशल्य पणास लावणार आहेत.

भारताचा 117 सदस्यीय चूम पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भाग घेणार आहे. भारताचा ऑलिम्पिकमधील इतिहास 124 वर्षांचा असून आतापर्यंत 27 प्रतियोगितांत भाग घेतलेला आहे. 1900 साली भारताने ऑलिम्पिकमध्ये प्रथम भाग घेतला आणि त्या वर्षीही ऑलिम्पिक गेम्सचे आयोजन पॅरिसमध्येच झाले होते. गेल्या 124 वर्षांच्या कालखंडात भारताने ऑलिम्पिकमध्ये भव्यदिव्य नसले तरी बरेच काही साध्य केलेले आहे. पण भारत अजूनही पहिल्या वीस पदक विजेत्यांच्या आसपास नाही. ऑलिम्पिक गेम्समध्ये आतापर्यंत बव्हंशी अमेरिकेने (1171 सुवर्ण) वर्चस्व गाजविले असून, त्यापाठोपाठ सोविएत युनियन (573 सुवर्ण), जर्मनी (305 सुवर्ण), ग्रेट ब्रिटन (296 सुवर्ण), चीन (1285 सुवर्ण), फ्रान्स (264 सुवर्ण), इटाली (259 सुवर्ण), स्वीडन (212 सुवर्ण), नॉर्वे (209 सुवर्ण) आणि रशिया (194 सुवर्ण) या देशांचा अग्रणी दहात समावेश आहे.

1900 मध्ये तत्कालीन ब्रिटिशांच्या अमलाखालील भारताने ऑलिम्पिकमध्ये प्रथम पदार्पण केले. नॉर्मन प्रीचर्ड नामक ॲथलेटने भारताचे प्रतिनिधित्व करताना 200 मीटर्स दौड आणि 200 मीटर्स अडथळ्यांची शर्यत अशा दोन प्रतियोगितांत रौप्यपदके जिंकली. कोलकाता येथे जन्मलेले नॉर्मन हे भारताचे ऑलिम्पिक पदक खाते खोलणारे पहिले ॲथलेट ठरले. कोलकात्यात जन्मलेले, पण मूळ ब्रिटिश असल्याने प्रीचर्ड यांनी मिळविलेली पदके आपली आहेत, असा ब्रिटनचा दावा आहे. पण भारतीय पासपोर्टवर त्यांनी पॅरिश ऑलिम्पिकमध्ये ही पदके जिंकलेली असल्याने ऑलिम्पिक असोसिएशनने ती भारताच्या खात्यावर नोंदलेली आहेत. प्रीचर्ड नंतर इंग्लंडला गेले आणि हॉलिवॅूड अभिनय क्षेत्रात त्यांनी ‘नॉर्मन ट्रेव्हर’ या नामाभिधानाने नाव कमावले.

मूलभूत साधनसुविधा, आर्थिक पाठबळाचा अभाव अशा परिस्थितीत भारतीय स्पर्धकांना ऑलिम्पिकमध्ये संघर्ष करावा लागला. पण अखेर 28 वर्षांनंतर हॉकी संघाने ऑलिम्पिक पदकांचा दुष्काळ संपुष्टात आणला. 1928 मधील ॲमस्टरडॅम येथील ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकीपटूंनी आपल्या कौशल्याचा आविष्कार घडवीत चक्क सुवर्णपदकाला गवसणी घातली. चार वर्षांनंतर लॉज एंजेलीस येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदक राखले आणि 1936 मधील बर्लिन ऑलिम्पिकमध्ये ‘हॉकीचे जादूगार’ ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली हॉकी सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक नोंदली!
दुसऱ्या महायुद्धाच्या अरिष्टातून सावरल्यानंतर ऑलिम्पिक पुन्हा सुरू झाला आणि 1948 मधील लंडन ऑलिम्पिक्समध्ये भारतीय हॉकी संघाने आपले श्रेष्ठत्व जारी राखीत सुवर्णपदकाची परंपरा कायम राखली. 1952 साली हेलसिंकी ऑलिम्पिक्स आणि 1956 मध्ये मेलबर्न ऑलिम्पिकमध्येही हॉकी अजिंक्यपदांची विजयी दौड जारी राखीत भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिक सुवर्णपदकांचा विजयी षटकार ठोकला. 1960 साली आशियाई प्रतिस्पर्धी पाकिस्तानने भारतीय हॉकीची सुवर्णदौड रोखताना ऑलिम्पिक हॉकी सुवर्णपदक जिंकले, पण 1964 मध्ये भारतीय हॉकी संघाने आपले हॉकी श्रेष्ठत्च पुन्हा सिद्ध करीत टोकयो ऑलिम्पिकमध्येही सुवर्णपदकाचा मान मिळविला आणि 1980 मध्ये मॉस्कोतही अजिंक्यपद मिळवीत भारताने आपले आठवे हॉकी ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळविले. हॉकीपटूंच्या अलौकिक कामगिरीवर भारतीय हॉकीने सुमारे तीन दशके आंतरराष्ट्रीय क्षितिजावर सत्ता गाजविली, पण त्यानंतर हॉकी संघामधील वाद, अनागोंदीमुळे भारताचा हॉकीतील सुवर्णपदक प्राप्तीचा संवेग मंदावला. 41 वर्षांच्या ऑलिम्पिक हॉकी पदकाच्या दुष्काळानंतर भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविले आणि त्यानंतर आणखी एक रौप्य तथा दोन कांस्यपदकांवर समाधान मानावे लागले.

वैयक्तिक ऑलिम्पिक पदकांची खऱ्या अर्थाने सुरुवात ‘करवीर’च्या लाल मातीत कुस्तीचे धडे गिरवलेल्या खशाबा जाधव यांनी सुरू केली. 1952 मधील हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये मराठमोळा कुस्तीगीर खाशाबा यांनी बँटमवेट गटात कांस्यपदक जिंकले. खाशाबा जाधव शिकत असलेल्या राजाराम महाविद्यालयाचे प्राध्यापक खर्डीकर यांनी आपले घर बँकेकडे गहाण ठेवून उभारलेल्या निधीवर जाधवांची हेलसिंकीची वारी शक्य केली होती, आणि अन्य विशेष सुविधांचा अभाव असतानाही करवीरच्या या कुस्तीगिराने कांस्यपदक जिंकत भारतीय तिरंगा हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये फडकावत वैयक्तिक गटात ऑलिम्पिक पदक जिंकणारा पहिला मूळ भारतीय ॲथलेट बनण्याचा मान मिळविला. ऑलिम्पिक पदकानंतर खाशाबांची कऱ्हाडपासून जन्मगाव गोळेश्वरपर्यंत 151 बैलगाड्यांच्या ताफ्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली. पण वैयक्तिक आयुष्य मात्र पालटलं नाही. चार वर्षांनंतर पोलिस दलात नोकरी मिळाली आणि पुढची 22 वर्षे बढतीशिवाय गेली. 1984 मध्ये मोटर अपघातात खाशाबांचे निधन झाले.

खाशाबा जाधवांच्या पदकप्राप्तीनंतर तब्बल 16 वर्षांनी निष्णात टेनिसस्टार लिएंडर पेसने ऑलिम्पिक पदकांची कोंडी फोडली. 1996 मधील अटलांटा ऑलिम्पिकमध्ये पेसला उपांत्य फेरीत अमेरिकेचा विश्वश्रेष्ठ टेनिसस्टार आंद्रे आगास्सीकडून हार पत्करावी लागली. पण कांस्यपदकाच्या लढतीत पेसने ब्राझिलच्या फर्नांडो मेलजिनीवर 3-6, 6-2, 6-4 असा झुंजार विजय मिळविला. भारताचे हे टेनिसमधील आजवरचे एकमेव पदक होय.
चार वर्षांनंतर 2000 मधील सिडनी ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगपटू कर्नाम मल्लेश्वरीने भारताची पदक प्राप्तीची ज्योत कायम राखताना 69 कि.ग्रॅ. गटात कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय ॲथलेट बनण्याचा मान मल्लेश्वरीने मिळविला.
लष्कर अधिकारी असलेल्या राजवर्धन राठोड यांनी कांस्यपदकाच्या परंपरेपुढे आणखी एक पाऊल टाकताना 2004 मधील अथेन्स ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीतील डबल ट्रॅप प्रतियोगितेत रौप्यपदक प्राप्त केले. ऑलिम्पिक रौप्यपदकानंतर ‘अर्जुन’, ‘पद्मश्री’ आणि ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’सह अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले राजवर्धर्न राठोड यांनी नंतर राजकारणात प्रवेश केला आणि 2014 मध्ये जयपूरच्या ग्रामीण मतदारसंघातून भाजपचे खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी भाजप सरकारात माहिती प्रसारण तथा क्रीडामंत्रिपदही भूषविले.

2008 मधील बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नेमबाज अभिनव बिंद्राने भारताचे ऑलिम्पिकमधील वैयक्तिक सुवर्णपदकाचे स्वप्न साकारले. नेमबाजीतील 10 मीटर एअर रायफल प्रतियोगितेत सुवर्णपदकावर नाव कोरीत अभिनवने ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय बनण्याचा मान पटकावला. अभिनवची ही अजोड कामगिरी युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरली. अभिनव आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटना ही ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’शी संलग्न असून त्याने ‘अभिनव बिंद्रा फाउंडेशन’ची स्थापना केली. तसेच भुवनेश्वर येथे ‘अभिनव बिंद्रा स्पोर्टस मेडिसीन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट’चीही स्थापना केली आहे. बिंद्राच्या अभिनव सुवर्णयुगाची शान राखताना कुस्तीपटू सुशील कुमार (66 कि.ग्रॅ.- फ्रीस्टाइल) आणि बॉक्सर विजेंदर सिंग (मिडलवेट) यांनीही बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदके पटकावली.

2012 मधील लंडन ऑलिम्पिमध्ये भारतीय ॲथलेटस्‌‍ने आणखी चमक दर्शविताना सहा पदके जिंकली. नेमबाज विजय कुमारने रौप्य आणि गगन नारंगने कांस्य पटकावले. कुस्तीपटू सुशील कुमारने बीजिंगमधील यशाहून आणखी एक पाऊल पुढे टाकताना रौप्यपदक जिंकले, तर योगेश्वर दत्तने कांस्यपदक पटकावले. भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवाल, बॉक्सर मेरी कोम यांनी आपापल्या क्रीडा प्रतियोगितांत कांस्यपदके जिंकली.
2016 मधील रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय स्पर्धकांकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण केवळ दोन पदकांवर समाधान मानावे लागले. उगवती ‘फुलराणी’ पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटनमध्ये रौप्य आणि साक्षी मलिकने कुस्तीमध्ये कांस्यपदक पटकावले.

2020 मधील टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने सर्वश्रेष्ठ कामगिरीत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य अशी सात पदके जिंकली आणि भालाफेकपटू नीरज चोप्राने या प्रतियोगितेत आपले अमोघ श्रेष्ठत्व प्रगटवीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नेमबाज अभिनव बिंद्रानंतर ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भारतीय बनण्याचा मान नीरजने पटकावला. मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये व रविकुमार दहियाने कुस्तीमध्ये रौप्यपदक मिळवले तर महिला बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि लोविना बोर्गोहेन (बॉक्सिंग) यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
भारतातर्फे विद्यमान प्रतियोगितेत 117 सदस्यीय स्पर्धक चमूने भाग घेतला असून 16 प्रतियोगितांत ते भारतीय तिरंग्याची शान उंचावण्यासाठी आपले कौशल्य पणास लावणार आहेत. विद्यमान ऑलिम्पिकमध्ये सहभाग असलेला विश्वविजेता निष्णात भालाफेकपटू तथा टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने एशियन गेम्स तसेच कॉमनवेल्थ गेम्स आणि डायमंड लीग ट्रॉफी स्पर्धाही जिंकलेल्या असून, आपली पदकप्राप्तीची लालसा कायम राखून तो दोन सुवर्णपदके जिंकणारा पहिला भारतीय बनेल अशी आशा बाळगूया! फ्रेंच ओपन आणि मलेशिया ओपन विजेत्या सात्त्विक साईराज शेट्टी आणि चिराग शेट्टी या बॅडमिंटन दुक्कलीकडूनही पदकप्राप्तीची अपेक्षा आहे. माजी वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियन तथा 2023 मधील वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये कांस्यपदक जिंकलेला कुस्तिगीर अंतिम संघ 53 कि.ग्रॅ. गटात पदक मिळवील अशी अपेक्षा आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील 69 कि.ग्रॅ. गटातील कांस्यपदक विजेती लोविना बोर्गोहेन विद्यमान प्रतियोगितेत 75 कि.ग्रॅ. गटात आव्हान देणार आहे. गतवर्षी वर्ल्ड चँपियनशीप जिंकलेली तसेच गत महिन्यात झेक प्रजासत्तामधील ग्रँड प्रिक्स उस्ती नाद लाबेममध्ये रजतपदक जिंकलेली लोविना आणखी एका ऑलिम्पिक पदकप्राप्तीसाठी उत्सुक असेल. 2020 मध्ये टोकियोत रौप्य तथा 2017 मधील वर्ल्ड चँपियनशीपमध्ये सुवर्णपदक जिंकलेली, ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू तसेच शरत कुमार, निखत झरीन आदींसह अन्य उमद्या ॲथलेटस्‌‍कडूनही पदकाच्या अपेक्षा आहेत. 2016 मधील रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य आणि 2020 मधील टोकयो ऑलिम्पिकमध्ये कांस्य अशी दोन ऑलिम्पिक पदके जिंकलेली ‘फुलराणी’ पी. व्ही. सिंधूकडून तिसऱ्या ऑलिम्पिक सुवर्णपदकाची अपेक्षा बाळगणे गैर ठरू नये! टोकियो ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकलेला भारत विद्यमान प्रतियोगितेत पदकांचा आकडा दुहेरी बनवील अशी अशा बाळगूया!

भारतीय ऑलिंपिक चमू
ॲथलेटिक्स : नीरज चोप्रा, किशोर जेना, अब्दुल्ला अबूबकर, मुहम्मद अनस याहिया, मोहम्मद अजमल, अक्षदीप सिंग, विकास सिंग, परमजीत सिंग बिश्त, प्रियांका गोस्वामी, अविनाश साबळे, पारुल चौधरी, ज्योती याराजी, किरण पहल, तेजिंदरपाल सिंग तूर, आभा खटुआ, अनू राणी, सर्वेश कुशारे, प्रवीण चित्रवेल, अमोज जेकब, संतोष तमिलारासन, राजेश रमेश, मिजो चाको कुरियन, विद्या रामराज, ज्योतिका श्री दांडी, एम. आर. पूवम्मा, सुभा व्यंकटेशन, प्राची, सूरज पनवार, जेसविन आल्ड्रिन, किरण पाल.
बॅडमिंटन : पी व्ही सिंधू, चिराग शेट्टी, सात्त्विक साईराज रेड्डी, एच. एस. प्रणय, लक्ष्य सेन, अश्विनी पोनप्पा, तनिषा क्रॅस्टो.
बॉक्सिंग : अमित पंचाल, निखत जरीन, लोविना बोर्गोहेन, जस्मिन लांबोरिया, प्रीती पवार, निशांत देव.
कुस्ती : विनेश फोगट, अंशू मलिक, अमन सेहरावत, निशा दहिया, रितिका हुडा, अंतिम पंघाल.
टेबल टेनिस : शरथ कमल, मनिका बत्रा, श्रीजा अकुला, हरमिर देसाई, मानव ठक्कर, अर्चना कामत.
गोल्फ : शुभंकर शर्मा, गगनजीत भुल्लर, आदिती अशोक, दीक्षा डागर.
टेनिस : सुमित नागल, रोहन बोपण्णा, श्रीराम बालाजी.
जलतरण : धिनिधी देसिंघू, श्रीहरी नटराज.
नौकानयन : विष्णू सावरणन, नेत्रा कुमानन.
इक्वेंस्ट्रियन : अनुष अगरवाल.
वेलिफ्टिंग : मीराबाई चानू.
रोहिंग : बलराज रोव्हिंग.
ज्युडो : तुलिका मान.
तिरंदाजी : दीपिका कुमारी, तरुणदीप राय, भजन कौर, अंकिता भगत, प्रवीण जाधव, धीरज बोम्मदेवरा.
नेमबाजी : पृथ्वीराज तोंडाईमन, मनू भाकर, ईशा सिंग, अंजुम मौदगिल, ऐश्वर्या प्रताप सिंग, राजेश्वरी कुमार, श्रेयसी सिंग, अनंतजीत सिंग, रायजा धिल्लन, माहेश्वरी चौहान, संदीप सिंग, अर्जुन बाबुता, इलावेनिल वालारिवन, रमिता जिंदाल, स्वप्निल कुसळे, सिफत कौर समरा, रैझघ धिल्लन, सरबज्योत सिंग, अर्जुन सिंग चिमा.
हॉकी : पी. आर. श्रीजेश, जरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), सुमित, संजय राजकुमार पाल, शमशेर सिंग, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, सागर प्रसाद अभिषेक, सुखजीत सिंग, ललित कुमार उपाध्याय, मनदीप सिंग, गुरजंत सिंग, निलाकांत शर्मा, जुगराज सिंग, कृष्णन बहादूर पाठक (राखीव).

  • सुधाकर रामचंद्र नाईक

बॉक्स
भारतीय वैयक्तिक ऑलिंपिक पदक विजेते
ॲथलेट पदक प्रतियोगिता स्पर्धा-वर्ष

  • नॉर्मन प्रिचर्ड रौप्य 200 मीटर्स पॅरिस 1990
  • नार्मन प्रिचर्ड रौप्य 200 मी. हर्डल्स पॅरिस 1990
  • खाशाबा जाधव कांस्य कुस्ती (57. कि.ग्रॅ) हेलसिंकी 1952
  • लीयांडर पेस कांस्य टेनिस अटलांटा 1996
  • कर्नाम मल्लेश्वरी कांस्य वेटलिफ्टिंग (54 कि.ग्रॅ.) सीडनी 2000
  • राज्यवर्धनसिंह राठोड रौप्य नेमबाजी, डबल ट्रॅप अथेन्स 2004
  • अभिनव बिंद्रा सुवर्ण नेमबाजी 10 मी. एअर रायफल शूटिंग बीजिंग 2008
  • विजेंदर सिंग कांस्य मुष्टियुध्द- मिटडलवेट बीजिंग 2008
  • सुशील कुमार कांस्य कुस्ती (66 कि.ग्रॅ.) बीजिंग 2008
  • सुशील कुमार रौप्य कुस्ती (66 कि.ग्रॅ.) लंडन 2012
  • विजय कुमार रौप्य 25 मी. रॅपिड पिस्तोल शूटिंग लंडन 2012
  • सायना नेहवाल बॅडमिंटन लंडन 2012
  • मेरी कोम कांस्य बॉक्सिंग- फ्लायवेट लंडन 2012
  • योंगेश्वर दत्त कांस्य कुस्ती (60 कि.ग्रॅ.) लंडन 2012
  • गगन नारंग कांस्य 100 मी. एअर रायफल शूटिंग लंडन 2012
  • पी. व्ही. सिंधू रौप्य बॅडमिंटन रिओ 2016
  • साक्षी मलिक कांस्य कुस्ती (58 कि.ग्रॅ.) रिओ 2016
  • मीराबाई चानू रौप्य वेटलिफ्टिंग (49 कि.ग्रॅ.) टोकयो 2020
  • लोविना बोर्गोहेैन कांस्य मुष्टियुध्द- वेल्टरवेट टोकयो 2020
  • पी. व्ही. सिंधू कांस्य बॅडमिंटन टोकयो 2020
  • रविकुमार दहिया रौप्य कुस्ती (57 कि.ग्रॅ) टोकयो 2020
  • बजरंग पुनिया कांस्य कुस्ती (65 कि.ग्रॅ.) टोकयो 2020
  • नीरज चोप्रा सुवर्ण भालाफेक टोकयो 2020