पॅरासेलिंगसाठी आलेल्या पर्यटकाचा मृत्यू

0
12

>> बायणा – वास्को येथील घटना

बायणा-वास्को येथे पॅरासेलिंग करून बोटीमध्ये जेवण करताना संजय श्रीवास्तव (34) या पर्यटकाला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी 3 वा. सुमारास घडली.

हार्बर कोस्टल पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी 3 वाजता ही घटना घडली. बंगळुरू येथील संजय व त्याची पत्नी अन्य पर्यटकांसह नेरुल येथून वॉटर स्पोर्ट्‌‍ससाठी बायणा किनाऱ्याजवळील बेटावर गेले होते. तेथे पॅरासेलिंग करून ते पुन्हा बोटीत परतले. बोटीत जेवण करताना त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर श्रीनिवासन यांना त्वरित बायणा किनाऱ्यावर आणून चिखली उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेले. मात्र, तेथे पोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

दरम्यान, या घटनेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. त्या पर्यटकाचा मृत्यू हा बुडून झाल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत स्थानिक वॉटर स्पोर्ट्‌‍स संघटनेने खंडन केले आहे. बायना बीच वॉटर स्पोर्ट्‌‍स कमिटीचे अध्यक्ष कार्लोस आल्मेदा यांनी त्या सर्व पर्यटकांनी जलक्रीडा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केले होते. त्यानंतर ते ज्या बोटीने आले होते त्या बोटीमध्ये ती दुर्घटना घडली असल्याचे त्यांनी सांगितले.