पॅराडाईज पेपर्स!

0
190

नोटबंदीच्या वर्षपूर्तीस सरकार काळा पैसा विरोधी दिन पाळण्याच्या तयारीत असतानाच पॅराडाईज पेपर्सच्या रूपाने एक नवा महाघोटाळा काल उजेडात आला. एका जर्मन वर्तमानपत्राने शोधपत्रकारांच्या एका आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मदतीने साडे तेरा दशलक्ष कागदपत्रांची जवळजवळ दहा महिने छाननी करून हे आर्थिक हलाहल बाहेर काढले आहे. इतर अनेक देशांप्रमाणेच बड्या बड्या भारतीय व्यक्ती आणि कंपन्यांनी करबुडवेगिरीसाठी विदेशांमध्ये केलेल्या उचापतींची ही जणू कुंडली आहे. एकूण ७१४ भारतीयांची नावे या यादीत आहेत. अर्थात यापूर्वीही अनेकदा अशा याद्या वेळोवेळी बाहेर आलेल्या आहेत. गेल्या वर्षी ‘पनामा पेपर्स’नी असाच गहजब माजविला होता. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यासह जगभरातील बड्या बड्या व्यक्ती त्यात गुंतल्याचे आढळून आले. भारतीयांची नावे त्यातही होती. त्यापूर्वी एचएसबीसीची स्वीस यादी बाहेर आली होती, त्यातही भारतीयांची नावे होती. त्यामुळे पुन्हा एकवार बाहेर आलेल्या या पॅराडाईज पेपर्समधूनही काही वेगळे समोर येईल असे नव्हे. कहाणी तीच आहे, फक्त नावे नवी आहेत. सर्वांची धडपड दिसते ती करबुडवेगिरीची. आपल्या देशाचा कर बुडवायचा आणि करमुक्त अर्थव्यवस्था असलेल्या जगातील १९ देशांपैकी कुठे तरी बनावट कंपन्या स्थापन करून आणि त्यांच्या मार्फत खोटेनाटे आर्थिक व्यवहार करून भारतातला काळा पैसा तेथे हलवायचा आणि दडवून ठेवायचा असा हा सारा प्रकार आहे. मग त्याच्या जोडीने त्यात लाचखोरी आली, मनी लॉंडरिंग आले, अनेक गैरगोष्टी मग जोडीने आल्याच. सगळ्यामागे एक गोष्ट समान आहे ती म्हणजे आपल्या देशाशी गद्दारी. अर्थात, पॅराडाईज पेपर्समध्ये जी नावे सध्या उघड झालेली आहेत, ते सगळेच गुन्हेगार आहेत असे नव्हे. आपल्याहून कमी कर असलेल्या अनेक देशांशी दुहेरी कर टाळण्यासाठी आपले करार केलेले असतात. अशा देशात केलेल्या आर्थिक व्यवहारांची योग्य माहिती जर संबंधित यंत्रणांकडे अधिकृतपणे दिली गेलेली असेल, तर तो गुन्हा ठरत नाही. त्यामुळे पनामा पेपर्स प्रमाणेच पॅराडाईज पेपर्स प्रकरणात समोर आलेली सगळीच नावे गुन्हेगारांची आहेत असे म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ – केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री जयंत सिन्हांचे नाव यात आलेले आहे. ते २०१४ साली हजारीबागेतून खासदार बनण्यापूर्वी ओमिडयार नेटवर्कचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक होते. या कंपनीने अमेरिकी कंपनी डी. डिझाईनमध्ये गुंतवणूक केली. त्या डी. लाईट डिझाईनची कॅरिबियन समुद्रातील कॅमॅन आयलंडमध्ये उपकंपनी आहे. या डी. लाईट डिझाईनने आपल्या या उपकंपनीतर्फे तीन दशलक्ष अमेरिकी डॉलरचे कर्ज घेतले. तेव्हा सिन्हा डी. लाईटचे संचालक होते. त्यामुळे पॅराडाईज पेपर्समध्ये त्यांचे नाव आलेले आहे. मात्र, आपण या व्यवहारात वैयक्तिक फायद्यासाठी नव्हे, तर ओमिडयारचा प्रतिनिधी म्हणून सहभागी झालो होतो व त्या व्यवहाराची माहिती आपण निवडणूक आयोग, आयकर विभाग आदींना वेळोवेळी दिलेली आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. पॅराडाईड पेपर्समध्ये समोर आलेल्यांमध्ये मोठमोठी नावे आहेत. अमिताभ बच्चनपासून मान्यता दत्तपर्यंत आणि पद्मभूषण डॉ. अशोक सेठपासून विजय मल्ल्या, कार्ती चिदंबरम, सचिन पायलटपर्यंत अनेकजणांची नावे आलेली आहेत. केवळ नावे आली म्हणून ते दोषी ठरत नाहीत, परंतु ते दोषी आहेत की नाहीत हे सिद्ध करण्याची जबाबदारी आता सरकारची आहे. यापूर्वीच्या याद्यांचे पुढे काय झाले? कोण गजांआड गेले? सर्वोच्च न्यायालयाने नेमलेले विशेष तपास पथक अनेक प्रकरणांचा अभ्यास करते आहे, परंतु अजूनही कोणत्याही बड्या करबुडव्याला देशाशी गद्दारी केल्याची सजा झालेली नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर करबुडवेगिरीच्या हिकमती लढवणार्‍यांपाशी यातून बाहेर पडण्यासाठी पळवाटा नसतील असे मानणे भोळेपणाचे ठरेल. त्यामुळे अशा नुसत्या याद्या येणे आणि त्यावर चार दिवस चर्चा होणे पुरेसे नाही. या व्यवहारांची काटेकोर आणि निष्पक्ष छाननी होऊन पुढील कारवाई झाली तरच या गौप्यस्फोटांना काही अर्थ असेल. अन्यथा अशा याद्या बाहेर येण्याची आणि चार दिवसांत सारे शांत होण्याची आपल्याला सवय जडून जाईल! काळ्या पैशाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून सरकारने सव्वा दोन लाख निष्क्रिय कंपन्यांची बँक खाती गोठवल्याचे सांगितले गेले. नोटबंदीनंतर पस्तीस हजार कंपन्यांनी केलेल्या सतरा हजार कोटींच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे. आता नोटबंदीच्या वर्षपूर्तीला नुसता काळा पैसाविरोधी दिवस साजरा करण्यापेक्षा या वर्षागणिक बाहेर येणार्‍या याद्यांमध्ये खोलवर जाऊन करबुडव्यांना कडक सजा देण्याची हिंमत हे सरकार दाखवील काय?