पॅराग्लायडिंगच्या मालकाला अपघातप्रकरणी अटक

0
2

केरी समुद्रकिनाऱ्याजवळच्या पठारावर बेकायदेशीररित्या पॅराग्लायडिंग सुरू करून पुणे येथील पर्यटक युवती शिवानी दाभाळे (27) व पॅराग्लायडिंग पायलट सुमन नेपाळी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला ‘हायक ॲण्ड फ्लाय’ कंपनीचा मालक शेखर रायजादा याला काल मांद्रे पोलिसांनी अटक केली.
वरील प्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे. शेखर रायजादा याच्याकडे पॅराग्लायडिंगसाठीचे कोणतेही परवाने नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. परवा शनिवारी पॅराग्लायडिंग पायलट सुमन नेपाळी व पर्यटक युवती शिवानी दाभळे ही दोघी पॅराग्लायडिंग करताना अपघातात ठार झाली होती.
पुणे येथील शिवानी ही आपल्या मित्रासोबत गोव्यात आली होती. गोव्यात आल्यानंतर केरी किनाऱ्यावर त्यांना पॅराग्लायडिंग करण्याची इच्छा झाली. केरी पठारावर पॅराग्लायडिंगसाठी शिवानी तिचा मित्र गेले. त्यांनी शेखरशी याबाबत संपर्क साधला. त्यानंतर शिवानी ही पॅराग्लायडिंग करण्यासाठी सुमन नेपाली या पायलटसोबत गेली. पॅराग्लायडिंग करत असतानाच दुर्दैवाने एक दोरी तुटून हा अपघात घडला. आणि दोघेही ठार झाले.
या दोघांचेही मृतदेह बांबोळी येथील इस्पितळातील शवागारात आहेत. परंतु अजून दोन्ही कुटुंबांचे नातेवाईक पोहोचले नसल्यामुळे मृतदेह त्याच ठिकाणी आहेत अशी माहिती मांद्रे पोलीस निरीक्षक शेरीफ जॅकीस निरीक्षकांनी दिली. मृतदेहाची ओळख पटवून नातेवाईक मृतदेह ताब्यात घेतील असे त्यांनी पुढे सांगितले.