भारतीय ऑलिम्पिक महासंघाने काल मंगळवारी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या पॅनचाक सिलाट संघातून २२ पैकी २० जणांना वगळले. वगळण्यामागे चुकीची माहिती दिल्याचे कारण महासंघाने दिले आहे. खेळाडूंना वगळल्यामुळे खवळलेल्या भारतीय पॅनचाक सिलाट महासंघाने कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबण्याचे ठरविले आहे. ५ जुलै रोजी भारतीय ऑलिम्पिक महासंघाने ५२४ ऍथलिट्सची यादी जाहीर केली होती. पॅनचाक सिलाटच्या २२ खेळाडूंचा समावेश होता. पॅनचाक महासंघाने या प्रकरणी ऑलिम्पिक महासंघाकडे स्पष्टीकरण मागितले असून याबाबत अजून त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही. पॅनचाक सिलाट महासंघाचे सरचिटणीस मुफ्ती हामिद यासिन यांनी मात्र खेळाडूंवरील अन्यायाप्रकरणी दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. खेळाडूंना वगळण्याचा हा पहिलाच प्रकार नसून काही दिवसांपूर्वीच ऑलिम्पिक महासंघाने संपूर्ण चार सदस्यीय ट्रायथ्लॉन संघालाच दिशाभूल करणारी माहिती दिल्याच्या कारणास्तव आशियाई क्रीडा स्पर्धेासाठी निवडलेल्या खेळाडूंमधून बाहेरचा रस्ता दाखवला होता.