दुबई
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (९३५ गुण) याने काल सोमवारी जाहीर झालेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीमध्ये आपले पहिले स्थान कायम राखले असून ऋषभ पंत व पृथ्वी शॉ यांनी मोठी झेप घेतली आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर काल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने क्रमवारी जाहीर केली.
हैदराबाद कसोटीत ७० व नाबाद ३३ धावा केलेल्या पृथ्वीने ६०वे स्थान प्राप्त केले आहे. पदार्पणाच्या कसोटीत शतक ठोकल्यानंतर पृथ्वी ७३व्या स्थानी होता. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याने आपली सकारात्मक वाटचाल कायम ठेवली असून दुसर्या कसोटीतील ९२ धावांवर आरुढ होत त्याने २३ स्थानांची मोठी प्रगती साधताना ६२व्या स्थानी हक्क सांगितला आहे. विंडीजविरुद्धच्या या मालिकेपूर्वी दिल्लीचा हा स्फोटक फलंदाज १११व्या स्थानी होता. राजकोट येथे झालेल्या पहिल्या कसोटीतही पंतला शतकाने हुलकावणी दिली होती. भारताच्या अन्य फलंदाजांमध्ये उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने चार क्रमांकांनी वर सरकताना १८वे तर गोलंदाजांत उमेश यादवने चार स्थानांची उडी घेत २५वा क्रमांक प्राप्त केला आहे.
वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याने तिन्ही विभागात सुधारणा केली आहे. गोलंदाजी विभागात त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम नववे स्थान प्राप्त केले आहे. फलंदाजीत तीन स्थानांनी पुढे सरकताना ५३वे स्थान त्याने आपल्या नावे केले आहे. अष्टपैलूंत दक्षिण आफ्रिकेच्या व्हर्नोन फिलेंडरला पछाडत त्याने तिसरा क्रमांक मिळविला आहे. पाहुण्या संघाच्या रॉस्टन चेज (+ १०, ३१वे स्थान) व शेय होप (+ ५, ३५वे स्थान) यांनी सकारात्मक दिशेने वाटचाल कायम राखली आहे. २-० अशा विजयानंतर भारताने आपल्या खात्यात एक गुण जमा केला आहे तर विंडीजचा एक गुण वजा झाला आहे.