माघारीनंतर गस्त घालण्यात येणार
पूर्वलडाख सेक्टरमधील डेमचोक आणि डेपसांग येथून भारतीय आणि चिनी सैन्याच्या माघारीला सुरुवात झाली आहे. 4 दिवसांपूर्वी दोन्ही देशांमध्ये या संदर्भात मोठा करार झाला होता. करारानुसार भारतीय सैनिकांनी त्यांची वाहने आणि दारूगोळा परत आणण्यास सुरुवात केली आहे.
काल शुक्रवारी भारतीय सैनिक माघारी यायला सुरूवात झाली आहे. यापूर्वी, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी, भारत आणि चीन यांच्यात 21 ऑक्टोबर रोजी सीमा गस्त व्यवस्थेवर एक करार झाला आहे. यामुळे मे 2020 पूर्वीची परिस्थिती पूर्वपदावर येईल असे म्हटले आहे.
दहा दिवस गस्त
दि. 21 ऑक्टोबर रोजी पहाटे 4:30 वाजता दोन्ही देशांच्या कॉर्प्स कमांडर्सनी अंतिम करारावर स्वाक्षरी केली होती. यानंतर दोन्ही देशांच्या सैन्याने छोट्या गटात माघार घ्यायला सुरुवात केली आहे. सैन्याने तंबू आणि शेड सारख्या काही तात्पुरत्या संरचना हटवल्या आहेत, परंतु पूर्ण माघार घेण्यास थोडा वेळ लागेल. परत आल्यानंतर गस्त सुरू होईल. सर्व काही सुरळीत झाल्यास 10 दिवसांत गस्त सुरू होऊ शकते.
मोदींची ब्रिक्समध्ये चर्चा
दोन दिवसांपूर्वी, ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. यामध्ये भारताने दोन्ही देशांमधील वाद आणि मतभेद योग्य पद्धतीने सोडवण्यावर भर दिला होता.
काय आहे करार?
पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर एप्रिल 2020 मध्ये पूर्वस्थिती पूर्ववत करण्यास चीन आणि भारत सहमत झाले आहेत. याचा अर्थ आता चिनी सैन्याने ज्या भागात अतिक्रमण केले होते तेथून माघार घेणार आहे.