पूरग्रस्तांना नुकसान भरपाई वितरण सुरू

0
123

>> डिचोली तालुक्यातील ४० जणांना मुख्यमंत्र्यांहस्ते झाले वितरण

गणेश चतुर्थीपूर्वी राज्यातील पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात येईल या गोवा विधानसभेत दिलेल्या आश्‍वासनानुसार सरकारने पूरग्रस्तांना नुकसान भरपाई वितरीत करण्याचे काम कालपासून सुरु केले. काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते डिचोली तालुक्यातील ४० पूरग्रस्तांना नुकसान भरपाईवे वितरण करण्यात आले. डिचोली तालुक्यातील १०५ पूरग्रस्तांना टप्प्या टप्प्याने ही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तर अन्य तालुक्यातील पूरग्रस्तांनाही टप्प्या टप्प्याने ती देण्यात येणार आहे. एकूण ८०० पूरग्रस्तांच्या नावांची यादी सरकारने तयार केलेली असून त्यांना एकूण १.५ कोटी रु. नुकसान भरपाईच्या रुपात वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल दिली.

डिचोली तालुक्यात घरात पाणी घुसल्याने नुकसान झालेले पूरग्रस्त तसेच शेती व बागायतीचे नुकसान झालेले शेतकरी मिळून १०५ जणांना मुख्यमंत्री निधीतून १० लाख रु. मंजूर झालेले आहेत.
पूरग्रस्तांना किमान १० हजार व जास्तीत जास्त १ लाख १० हजार रु. अशी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

दरम्यान, मंगळवारी सकाळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यानी सरकारने पूरग्रस्तांना नुकसान भरपाई वितरीत न केल्याबद्दल सरकारवर जोरदार टीका केली होती. पूरग्रस्तांना नुकसान भरपाई वितरीत न करुन सरकारने असंवेदनशीलतेचे दर्शन घडवल्याचा आरोप कामत यांनी केला होता.

मात्र, मंगळवारी संध्याकाळी राज्य सरकारने डिचोली, पेडणे व तिसवाडी तालुक्यातील काही पूरग्रस्तांना पहिल्या टप्प्यात नुकसान भरपाईचे वितरण केले.

पेडण्यात ११९ पूरग्रस्तांना
नुकसान भरपाई मंजूर
दरम्यान, पेडणे तालुक्यातील ११९ पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. त्यांना १६ लाख ८६ हजार रु. नुकसान भरपाईच्या रुपात मंजूर करण्यात आले आहे. काल नुकसान भरपाई वितरीत करण्याचा कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.