पूजा शर्माच्या अटकपूर्व जामिनावर उद्या निवाडा

0
14

आसगाव येथे प्रदीप आगरवाडेकर यांच्या घराचा भाग पाडण्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित पूजा शर्मा हिने उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरील युक्तिवाद काल पूर्ण झाला. न्यायालयाने या अटकपूर्व जामीन अर्जावरील निवाडा बुधवारी दुपारपर्यंत राखून ठेवला आहे.
घराचा भाग पाडण्याच्या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता पूजा शर्मा हिची पोलीस कोठडीत चौकशीची आवश्यकता आहे. तिने घर पाडण्याचा कट रचला असून, या प्रकरणात तिची भूमिका आणि आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात पुरावे गोळा करण्यासाठी तिची कोठडीत चौकशी आवश्यक आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
आगरवाडेकर कुटुंबाने मूळ मालक ख्रिस पिंटो यांच्याकडून एनओसी घेतल्यानंतर घराचा कर, वीज आणि पाण्याची बिले भरत होते. सध्याचा मालक न्यायालयाकडून त्यांना आदेश मिळाल्यानंतरच त्या कुटुंबाला घराबाहेर काढू शकतो; पण त्यांनी तसे काही केले नाही, असा युक्तिवादही सरकारी वकिलांनी केला.
घर पाडण्याचे काम सकाळी 11.30 वाजता सुरुवात होऊन संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत कसे चालले? पोलिसानी घर पाडण्याचे काम का थांबविले नाही? अशी विचारणा न्यायालयाने केली. या प्रकरणात पोलिसांची भूमिका तपासली जात आहे. या प्रकरणी 3 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली.