पूजा शर्माच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी

0
13

आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर यांचे घर पाडण्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी पूजा शर्मा हिच्या अटकपूर्व जामिनावर आता उद्या शुक्रवार 5 जुलै 2024 रोजी दुपारी सुनावणी होणार आहे. पोलिसांनी पूजा शर्मा हिला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास विरोध दर्शविला आहे.

येथील उत्तर गोवा प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयात संशयित पूजा शर्मा हिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. न्यायालयात या अटकपूर्व जामीन अर्जावर काल सुनावणी घेण्यात आली. घर पाडण्याच्या प्रकरणातील पूजा शर्मा ही मुख्य संशयित असून तिला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास पोलिसांनी सुनावणीच्यावेळी विरोध केला. पूजा शर्मा ही घर असलेल्या जमिनीची मालक आहे. सदर जागेतील घर पाडण्यासाठी कट रचण्यात आला आहे. पूजा शर्मा हिला चौकशीसाठी दोन समन्स बजावूनही चौकशीसाठी हजर राहिलेली नाही, असे गुन्हा अन्वेषण विभागाने अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करताना म्हटले आहे.
संशयित आरोपी पूजा शर्मा हिच्या वकिलांनी पोलिसांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी वेळ मागून घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणी पुढील सुनावणी शुक्रवारी ठेवण्यात आली आहे.

गोवा पोलिसांनी पूजा शर्मा हिच्या विरोधात केलेले आरोप निराधार आहेत, असा दावा पूजा शर्मा हिचे वकील ॲड. सुरेंद्र देसाई यांनी काल सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना केला. पूजा शर्मा हिने सुमारे 1 कोटी रुपये खर्चून घर असलेली सदर जमीन खरेदी केली आहे. पूजा शर्मा हिला अडचणीत आणण्यासाठी कुणीतरी घर पाडण्याचा दावा केला असल्याचे वकील ॲड. देसाई यांनी सांगितले. पोलिसांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनाला विरोध करताना केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी वेळेची गरज आहे. त्यामुळे जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

महासंचालकांच्या बदलीबाबत अद्याप निर्णय नाही

आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर यांच्या घराचा भाग पाडण्यात आल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे पोलीस महासंचालक डॉ. जसपाल सिंग यांच्या बदलीबाबत केंद्रीय पातळीवरून अजूनपर्यंत कोणताही निर्णय झालेला आहे.

राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पोलीस महासंचालक डॉ. जसपाल सिंग यांच्या बदलीची शिफारस केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मंगळवारी तातडीने दिल्लीला रवाना झाले आहे. तथापि, अजूनपर्यंत पोलीस महासंचालकाच्या बदलीबाबत केंद्रीय पातळीवरून कोणताही निर्णय झालेला नाही. आसगाव येथील आगरवाडेकर यांचे घर पाडण्यात आल्याप्रकरणात मुख्य सचिवांनी चौकशी केली. हणजूणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी मुख्य सचिवांना सादर केलेल्या अहवालात घर पाडण्यासाठी सहकार्य करण्यासाठी पोलीस महासंचालकांकडून दबाव होता, असे नमूद केले आहे. या प्रकरणानंतर विरोधकांनी राज्य सरकार आणि पोलीस महासंचालकावर जोरदार टीका करून पोलीस महासंचालकांच्या बदलीची मागणी केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पोलीस महासंचालकाच्या बदलीप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत भेट घेणार आहेत.