पूजा शर्माचा अटकपूर्व जामीन फेटाळला

0
2

>> उत्तर गोवा जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा निवाडा; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

उत्तर गोवा प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर यांच्या घराची मोडतोड प्रकरणातील मुख्य संशयित पूजा शर्मा हिचा अटकपूर्व जामीन अर्ज काल फेटाळून लावला. न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने पूजा शर्मा हिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता तिला पोलीस अटक करतात की ती स्वत:च शरण येते हे पाहावे लागणार आहे.

गेल्या महिन्यात जमिनीच्या वादातून दिल्लीस्थित पूजा शर्मा नामक महिलेने आल्त-आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर यांचे निवासी घर गुंडांच्या मदतीने बुलडोझरचा वापर करून पाडले होते. यावेळी संशयितांनी प्रदीप आगरवाडेकर व त्यांच्या पुत्राचे अपहरणही केले होते. प्रदीप आगरवाडेकर व त्यांच्या पुत्राची अपहरणकर्त्यांनी नंतर सुटका केली होती. यानंतर हणजूण पोलिसांनी संशयित पूजा शर्मा व इतरांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. तसेच या प्रकरणात काही बाऊन्सर व दलाल अशा एकूण 8 जणांना अटक केली होती. या प्रकरणात हणजूण पोलिसांनी 2 संशयितांना आणि गुन्हा शाखेने 6 जणांना अटक केली होती. तसेच दोन वाहने जप्त
केली होती.

आसगाव घर मोडतोड प्रकरणामागे पूजा शर्मा ही मुख्य सूत्रधार असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने पूजा शर्मा हिला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. पूजा शर्मा हिला एसआयटीने 26 जून आणि 1 जुलैला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते; मात्र दोन्ही तारखांना ती चौकशीस हजर राहिली नव्हती.

तसेच, गोवा पोलिसांचे पथक पूजा शर्मा हिला अटक करण्यासाठी मुंबईला गेले होते. त्यापूर्वी पूजा शर्मा हिने येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात तीन दिवस जोरदार युक्तिवाद झाला.

घराचा भाग पाडण्याच्या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता पूजा शर्मा हिची पोलीस कोठडीत चौकशीची आवश्यकता आहे. तिने घर पाडण्याचा कट रचला असून, या प्रकरणात तिची भूमिका आणि आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात पुरावे गोळा करण्यासाठी तिची कोठडीत चौकशी आवश्यक आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता, तर पूजा शर्मा हिच्या वकिलांनी या प्रकरणामध्ये तिला नाहक गुंतविण्यात आल्याचा दावा केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सोमवारी या अर्जावरील निवाडा राखून ठेवला होता. त्यानंतर काल निवाडा देताना पूजा शर्मा हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

पोलीस महासंचालकांची बदली रखडली

>> पोलिसांवर दबाव आणल्याचा होता आरोप

आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर यांच्या घराच्या मोडतोड प्रकरणामध्ये पोलीस महासंचालक डॉ. जसपाल सिंग यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचे उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारने 29 जूनला केंद्र सरकारकडे त्यांची बदली करण्याची शिफारस केली होती. ही शिफारस करून 10-12 दिवस उलटले तरी त्यांची बदली न झाल्याने तो चर्चेचा विषय बनलेला आहे.

राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांची शिफारस केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने नवी दिल्लीला धाव घेतली होती. त्यामुळे त्यांची लवकर बदली होण्याची शक्यता व्यक्त होत होती. तथापि, या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचे उघडकीस येऊन 10-12 दिवस उलटले तरी सुध्दा अजूनपर्यंत पोलीस सिंग यांची बदली झालेली नाही.
दरम्यान, आसगाव प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर पोलीस महासंचालक डॉ. जसपाल सिंग हे एक दिवस नवी दिल्लीला जाऊन आले आहेत.