पूजा शर्माकडून पोलीस तपासाला सहकार्य नाही

0
11

>> सरकारी वकिलांचा न्यायालयात युक्तिवाद

आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर यांच्या घराचा भाग पाडण्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित पूजा शर्मा ह्या पोलीस तपासासाठी सहकार्य करीत नाही, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयात पूजा शर्मा हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीच्या वेळी अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करताना काल केला. दरम्यान, पूजा शर्मा हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी शनिवार 6 रोजी घेतली जाणार आहे.
येथील उत्तर गोवा जिल्हा न्यायालयात आसगाव येथील आगरवाडेकर यांचे घराचा भाग पाडण्याच्या प्रकरणातील संशयित आरोपी पूजा शर्मा हिच्या अटक जामीन अर्जावर काल शुक्रवारी सुनावणी झाली. या प्रकरणाच्या तपासासाठी उपस्थित राहण्यासाठी पूजा शर्मा हिला अनेक नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. तथापि, तिच्याकडून नोटीसला प्रतिसाद दिला जात नाही. पूजा हिला 5 जुलै रोजी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगून तिसरे समन्सही बजावण्यात आले होते, असे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. तथापि, पूजा शर्मा हिच्या वकिलाने कोणतीही नोटीस, समन्स मिळाले नाही असा दावा केला. या प्रकरणात पूजा शर्मा पूर्णपणे निर्दोष आहे. या प्रकरणात बरेच राजकारण आहे, असा युक्तिवाद पूजा शर्माच्या वकिलांनी न्यायालयात केला. ख्वाजा पूर्वीच्या मालकाच्या वतीने सक्रिय होता. पूजा शर्मा मालमत्तेचा हक्काचा मालक आहेत. तिला मालमत्ता ताब्यात घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. कायदा पूजा शर्माला अतिक्रमण करणाऱ्याला बाहेर काढण्याचा अधिकार देतो, असा युक्तिवाद पूजा शर्मा हिच्या वकिलांनी केला. प्रदीप आगरवाडेकर हा चोपडे येथील रहिवासी असून त्याने मालमत्तेवर बेकायदा कब्जा केल्याचा दावा पूजाच्या वकिलांनी न्यायालयात केला.