पूजा नाईकला पर्वरी पोलिसांकडून अटक

0
1

पैशांच्या बदल्यात सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांना गंडा घालणारया पूजा नाईक हिला पर्वरी पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. पूजा, अजित सतरकर आणि अनिशा सतरकर (पिसगाळ, प्रियोळ) यांनी संगनमताने पर्वरीतील गृहनिर्माण मंडळ वसाहतीतील प्रिया रवींद्र मांद्रेकर या महिलेला सुमारे चार लाखांचा गंडा घालण्याचा प्रकार घडला होता.

प्रिया यांनी पर्वरी पोलीस स्थानकात तत्सबंधी तक्रार दि. 23 ऑक्टोबर रोजी नोंदवली होती. दि. 20 नोव्हेंबर 2021 ते दि. 12 डिसेंबर, 2021 दरम्यान सुमारे चार लाखांची रक्कम कुर्टी येथील कॅनरा बँकेत प्रियाने जमा केली होती. पैसे घेऊन सरकारी नोकरी देण्यास टाळाटाळ करण्यात येऊन घेतलेली रक्कमही परत करण्यात आली नसल्याने प्रियाने पर्वरी पोलीस स्थानकात तिघांविरुद्ध तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा नोंदवला होता. आता पर्वरी पोलिसांनी पूजा नाईक हिला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे.

काणकोणात नोकरीच्या नावाखाली 5 लाखांना गंडा, एकास ताब्यात

पैंगीण येथील कृष्णा कमलाकर नाईक यांना पोलीस खात्यामध्ये नोकरी देतो असे सांगून 5 लाख रू.ना गंडा घालण्यात आल्याचे नवीन प्रकरण समोर आले असून या प्रकरणी काणकोण पोलिसांनी पर्येे येथील रामेश्वर मांद्रेकर या युवकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पोळे येथील रवित भंडारी या संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत.

वर्षभरापूर्वी पोलीस खात्यामध्ये नोकरी देण्याचे आश्वासन देऊन या दोघांनी आगाऊ रक्कम म्हणून श्री. नाईक यांच्याकडून पाच लाख रूपये घेतले होते. मात्र वर्ष उलटले तरी नोकरी न दिल्याने कमलाकर नाईक यांनी काणकोण पोलीस स्थानकावर तक्रार नोंदवली. त्यानंतर हे नवीन प्रकरण पुढे आले आहे.